शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई द्या ः संभाजी ब्रिगेड

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याचे पंचनामे करून त्वरित नुकसानभरपाई द्यावी. त्याचबरोबर शेतकऱ्यांना संपूर्ण पीक कर्जमाफी आणि वीजबिलमाफी द्यावी, तसेच बि-बियाणे उपलब्ध करून द्यावे, अशा मागण्या मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड आणि किसान क्रांती आंदोलन या संघटनांनी केल्या आहेत.

शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, याचे पंचनामे करून त्वरित नुकसानभरपाई द्यावी. त्याचबरोबर शेतकऱ्यांना संपूर्ण पीक कर्जमाफी आणि वीजबिलमाफी द्यावी, तसेच बि-बियाणे उपलब्ध करून द्यावे, अशा मागण्या मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड आणि किसान क्रांती आंदोलन या संघटनांनी केल्या आहेत. या मागण्यांसाठी येत्या शुक्रवारी (ता.15) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अकरा ते एक या वेळेत आंदोलन करण्यात येणार असल्याचे संघटनांचे मुख्य समन्वयक शांताराम कुंजीर यांनी सांगितले. 

कुंजीर म्हणाले, ""राज्यात ओल्या दुष्काळामुळे खरीपासह रब्बी हंगामही वाया गेला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने प्रतिएकर 50 हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी. यासाठी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यात येणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी भाजप-शिवसेना युतीला बहुमत दिलेले असतानाही त्यांनी मुख्यमंत्रिपदावरून गोंधळ घालत राज्यावर राष्ट्रपती राजवटीची नामुष्की आणली आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानाकडे दुर्लक्ष केले आहे. यामुळे राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी शेतकऱ्यांस न्याय दयावा.'' 

येत्या काळात राज्य स्तरावर आंदोलन करण्याचा विचार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. याप्रसंगी प्रमोदसिंग गोतारने, प्रदीप कणसे, विशाल तुळवे, अजित कार्ले, प्रशांत धुमाळ, अनिल ताडगे, जगजीवन काळे आदी उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sambhaji Brigade demands relief for farmers