आता संभाजी ब्रिगेडही निवडणूक आखाड्यात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 जानेवारी 2017

न्याय्य मागण्यांसाठी प्रचंड संघर्ष करावा लागल्याने निवडणुकीच्या मैदानात उतरावे लागत असल्याचे कारण संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण आखरे यांनी त्यासाठी दिले आहे.

पिंपरी : अनेक राजकीय पक्षांनी 'संभाजी ब्रिगेड' या आक्रमक संघटनेचा शिडीसारखा वापर आतापर्यंत राजकारणासाठी करून घेतल्याचे या संघटनेच्या आता ध्यानात आले आहे. त्यामुळे आता स्वतःच ती राजकारणात उतरली असून पिंपरी-चिंचवड आणि पुणे महापालिकेची आगामी निवडणूक स्वतंत्रपणे लढविणार आहे. परिणामी यापुढे दांडा आणि त्यावरील झेंडा आणि अजेंडाही आपलाच ठेवण्याचा निश्‍चय त्यांनी केला आहे. दरम्यान, 'संभाजी ब्रिगेड'च्या 'एंट्री'मुळे मराठा मतांत फाटाफूट होणार असून त्याचा फटका शिवसेनेसह सर्वच पक्षांना बसण्याची शक्‍यता आहे. 

ब्रिगेडच्या झेंड्यावर इतर पक्ष आपला झेंडा आतापर्यंत लावून आपला हेतू साध्य करून घेत होते. मात्र, हा दुरुपयोग त्यांनी आता थांबविण्याचे ठरविले आहे. मात्र, न्याय्य मागण्यांसाठी प्रचंड संघर्ष करावा लागल्याने निवडणुकीच्या मैदानात उतरावे लागत असल्याचे कारण संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण आखरे यांनी त्यासाठी दिले आहे. त्यामुळे दोन्ही शहरातील राजकीय समीकरणे काहीअंशी आता बदलणार आहेत. सर्व जागा लढविणार असून खाते निश्‍चित उघडेल, असा ब्रिगेडचा दावा आहे.स्वच्छ आणि चारित्र्यशील तरुणांना ते उमेदवारी देणार आहेत. मराठवाड्यासह विदर्भातही ताकद असल्याने तेथेही यश मिळेल, अशीही त्यांना आशा वाटत आहे. 

'राजकारणात आलो, तरी शंभर टक्के समाजकारणही करणार असून आक्रमकपणा हा पिंड कायम ठेवणार आहे. संघटना ग्रामीण भागात शेतीमालाला हमीभाव आणि दारूमुक्त गाव' ही संकल्पना राबविणार आहे''. 
- मनोज आखरे, प्रदेशाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड 

'पिंपरी-चिंचवडमधील रस्ते मोठे झाले, म्हणजे शहराचा विकास झाला असे नाही. पण तो झाला असल्याची आवई सत्ताधाऱ्यांनी उठविली असून शहरात अनेक प्रश्‍न प्रलंबित आहेत''. 
- अभिमन्यू पवार, जिल्हाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड 

Web Title: sambhaji brigade jumps into election fray