संभाजी महाराज जयंती उत्साहात    

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 मे 2019

संभाजी महाराज यांच्या वेशातील छोटा संभाजी... मर्दानी खेळ... पालखीतील संभाजी राजेंची आकर्षक मूर्ती... वाद्यांचा ताल आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा जयघोष, अशा उत्साहपूर्ण वातावरणात शहरात छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.

पुणे - संभाजी महाराज यांच्या वेशातील छोटा संभाजी... मर्दानी खेळ... पालखीतील संभाजी राजेंची आकर्षक मूर्ती... वाद्यांचा ताल आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा जयघोष, अशा उत्साहपूर्ण वातावरणात शहरात छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.

संभाजी ब्रिगेड आणि अखिल भारतीय शिवमहोत्सव समिती, मराठा सेवा संघ आणि जिजाऊ ब्रिगेड यांच्या तर्फे श्री छत्रपती संभाजीराजे जन्मोत्सव सोहळा शहरात मंगळवारी  पार पडला. 

एसएसपीएमएस मैदान ते डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराज चौक अशी मिरवणूक काढली. विविध मर्दानी खेळांचे सादरीकरण झाले. मिरवणुकीची सांगता डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून झाली. छत्रपती संभाजीराजे यांच्या पुतळ्याला खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार संजय काकडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. 

मराठा सेवा संघाचे पुरुषोत्तम खेडेकर, माजी आमदार चंद्रकात मोकाटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन तुपे, माजी महापौर प्रशांत जगताप, महापालिका सहआयुक्त ज्ञानेश्‍वर मोळक, नगरसेवक दत्ता खाडे, प्रशांत धुमाळ, सचिन आडेकर, विराज तावरे आदी उपस्थित  होते.  

शिवमहोत्सव समितीचे अध्यक्ष विकास पासलकर यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण करण्याची मागणी केली. ही मागणी रास्त असून, सर्वांनी एकत्र मिळून संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण केले पाहिजे, असे सुळे म्हणाल्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sambhaji Maharaj Jayanti