Vidhan Sabha 2019 : ‘कोणता झेंडा घेऊ हाती...’

संभाजी पाटील
रविवार, 15 सप्टेंबर 2019

यात्रेच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचाराचा धुरळा उडविला आहे, तर दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मात्र पक्षातील ‘बडे मासे’ भाजपच्या गळाला लागल्याने अस्वस्थ आहेत.

विधानसभा 2019

यात्रेच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचाराचा धुरळा उडविला आहे, तर दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मात्र पक्षातील ‘बडे मासे’ भाजपच्या गळाला लागल्याने अस्वस्थ आहेत. लोकसभा निवडणुकीत आपल्या प्रचार सभांमुळे ‘लाइम लाइट’मध्ये असणाऱ्या राज ठाकरे यांचा मनसे प्रत्यक्ष निवडणूक लढवायची की निवडणुकीत भागच घ्यायचा नाही, या संभ्रमावस्थेत अडकला आहे. ‘एमआयएम’ने स्वतंत्र चूल मांडण्याचा निर्णय घेतल्याने वंचित आघाडीतील ‘बहुजन’ विखुरला आहे. राज्याच्या विधानसभा निवडणुकीत प्रथमच विरोधी पक्षांची अवस्था केविलवाणी झाली आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना एकापाठोपाठ पक्षात आणून भाजपने विधानसभेसाठी धक्कातंत्राचा वापर सुरू ठेवला आहे. यातून विरोधी पक्षांचे काही खरे नाही, ताकदीचे विरोधक उरलेच नाहीत, हा आभास निर्माण करण्यात त्यांना यश आले आहे. लोकसभा निवडणुकीत फसलेले डाव पुन्हा नव्याने खेळण्याचा जोरदार प्रयत्न भाजप करीत आहे. या नव्या राजकीय समीकरणांचाच एक भाग म्हणून पुणे जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील, साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे यांचे पक्षप्रवेश करून विरोधकांवर दबाव वाढविण्यात भाजपला यश आले आहे. एका बाजूला बड्या नेत्यांच्या पक्षप्रवेशाने विरोधकांना सततचे धक्के द्यायचे आणि दुसरीकडे महाजनादेश यात्रेनिमित्ताने पक्षकार्यकर्त्यांना ‘चार्ज’ करायचे, या दुहेरी रणनीतीत मुख्यमंत्री यशस्वी झालेले दिसतात. पुण्यात महाजनादेश यात्रेनिमित्ताने भाजपच्या इच्छुकांमध्येच स्पर्धा लावण्यातही त्यांना यश आले. ही स्पर्धा पुणेकरांना होर्डिंग, पोस्टर्सच्या चढाओढीतून अगदी रस्त्यावरच पाहायला मिळाली. ‘जर एवढे वातावरण चांगले आहे म्हणता, मग हा दिखावा कशासाठी,’ हा प्रश्‍नही चाणाक्ष पुणेकरांना पडल्याशिवाय राहिला नाही.

पुण्यातील भाजपचे उमेदवार कोण असणार? याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. त्यांची अंतिम यादीही तयार असल्याचे त्यांचे निकटवर्तीय सांगतात. त्यामुळे महाजनादेश यात्रेत सर्वाधिक बॅनर्स लावणारा, जास्तीत जास्त गर्दी करणारा इच्छुक मुख्यमंत्र्यांच्या मनात भरेल असे नाही. मात्र, यानिमित्ताने पुण्यात भाजपच्या प्रचाराचा नारळ फुटला, हे नक्की. पुण्यात पक्षाला सध्यातरी चांगले वातावरण आहे. मात्र शिवाजीनगर, कसबा, पुणे कॅंटोन्मेंट आणि हडपसर या चार विधानसभा मतदारसंघांत विरोधी पक्षाला कमी लेखून चालणार नाही. चांगले उमेदवार, विरोधकांची एकी, स्थानिक मुद्द्यांवर भर देत सत्ताधाऱ्यांवर प्रहार केल्यास निकाल फिरविण्याची ताकद या मतदारसंघांमध्ये आहे. प्रश्‍न आहे तो पराभूत मानसिकतेत वावरणाऱ्या विरोधी पक्षांच्या महत्त्वाकांक्षेचा.

मनसेला पुण्यात सध्यातरी तीन ते चार जागांवर गांभीर्याने लढायचे आहे, असे दिसते. पण, स्वतंत्र लढायचे की आघाडीसोबत राहून काही जागांवर आघाडी करून लढायचे, याबाबत निर्णय होत नाही. हडपसर, कसबा, कोथरूड, खडकवासला या मतदारसंघांत पक्षाकडे इच्छुक आणि कार्यकर्तेही आहेत. जर मनसे काँग्रेस आघाडीसोबत राहिला आणि हडपसरसारखी एखादी जागा मनसेला मिळाली, तरी राजकीय वातावरण बदललेले दिसेल. पण, राज ठाकरे यांच्या मनात काय आहे? याचा अंदाज सध्यातरी बांधणे कठीण आहे.

वंचित आघाडीतून ‘एमआयएम’ बाहेर पडल्याने त्याचे पडसाद निश्‍चितच पुण्यातही उमटणार आहेत. वडगाव शेरी, हडपसर आणि पुणे कॅंटोन्मेंट या तीन मतदारसंघांत या दोन्ही पक्षांचा प्रभाव आहे. ‘दलित-मुस्लिम-ओबीसी’ हे समीकरण बिघडल्याने त्याचा फायदा पुन्हा भाजपलाच होणार, हे स्पष्ट आहे. त्यामुळे ‘आरपीआय’पासून दुरावलेला आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता आणि काँग्रेस आघाडी वाऱ्यावर असलेला मुस्लिम कोणती भूमिका घेणार, हे महत्त्वाचे ठरणार आहे.

या आठवड्यात विधानसभेची आचारसंहिता जाहीर होईल, उमेदवार जाहीर होतील आणि प्रचारही सुरू होईल. पण, शेवटच्या क्षणापर्यंत  विरोधी पक्षांतील सर्वच आघाड्यांवर गोंधळाची परिस्थिती निर्माण करण्यात भाजपला यश आले आहे, हे नक्की. त्यामुळे आजवर पक्षाचा चेहरा वर्षानुवर्षे सोबत असणारे नेते पक्ष सोडून गेल्यावर विश्‍वास पक्षावर ठेवायचा की नेत्यांवर, या संभ्रमात अडकलेल्या आणि पक्षावर निष्ठा असणाऱ्या कार्यकर्त्यांची अवस्था मात्र ‘विठ्ठला... कोणता झेंडा घेऊ हाती’ अशीच आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sambhaji Patil article State Assembly Elections