ते आले, त्यांनी पाहिले आणि ते परतलेही...

संभाजी पाटील @psambhjisakal
Friday, 31 July 2020

राज्याचे स्टेरिंग माझ्याच हाती आहे, हे दाखवण्याच्या प्रयत्नात मुख्यमंत्री स्वतः गाडी चालवत आले खरे , पण ज्या कारणासाठी पुण्यात आले त्याबाबत कोणताही ठोस निर्णय किंवा आदेश न करताच ते मुंबईला परत गेलेही. त्यामुळे पुणेकरांच्या पदरी निराशाच पडली. 

'जम्बो हाॅस्पिटल उभारा',  'पुणेकरांनो गाफील राहू नका', 'ऑक्सिजनयुक्त रुग्णवाहिका तयार ठेवा', आदी मोघम सूचना फक्त त्यांनी केल्या. मात्र, राज्यात सर्वाधिक रुग्ण संख्या वाढत असणाऱ्या पुण्यात हे संकट रोखण्यासाठी काहीतरी 'ॲक्शन प्लॅन' ठरण्याची आवश्यकता होती,  मुख्यमंत्र्यांसह अर्धा डझन मंत्री पुण्यातील बैठकीला हजर असतानाही कोणतेही ठोस निर्णय झाले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

पुणे जिल्ह्यात एकूण 81 हजारांवर कोरोना रुग्णांची संख्या पोहोचली आहे, तर मृतांचा आकडा दोन हजारांच्या आसपास गेला आहे. दररोज सरासरी पंचवीस ते तीस लोकांचा मृत्यू होत आहे. अशी गंभीर स्थिती असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः पुण्यात येऊन बैठक घेतली. या बैठकीस 'कार्यक्षम' पालकमंत्री अजित पवार यांसह अनेक वरिष्ठ मंत्री उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी बैठकी पूर्वीच लोकप्रतिनिधींचे म्हणणे ऐकून घेतले. यात लोकप्रतिनिधींनी अडचणींचा पाढा वाचला. प्रशासन, राज्य सरकार आणि लोकप्रतिनिधी यांच्यात कोणताही समन्वय नसल्याचे यानिमित्ताने मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आले. स्वतः पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनीच शहरातील सुमारे एक हजार मृत्यूंची कोरोना बळी म्हणून नोंदच झाली नाही, असा गौप्यस्फोट केला आणि प्रशासकीय यंत्रणेतील गोंधळ चव्हाट्यावर आणला. पुण्यातील स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असल्याची जाणीव वारंवार सर्व यंत्रणांनी करून दिली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वतः दर आठवड्याला अधिकार्‍यांची आढावा बैठक घेत होते. महापालिका आयुक्तांसह अनेक अधिकारी याकाळात बदलून झाले, डझनाहून अधिक वरिष्ठ 'आयएएस' अधिकारी नेमून झाले, तरीही ही पुण्यातील परिस्थिती आटोक्यात आणण्यात यश आले नसल्याचे स्पष्ट झाले. 

Image

त्यामुळे सर्वांच्या अशा मुख्यमंत्र्यांच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत इकडे लागल्या होत्या. मुंबईत कोरोना चे संकट सर्वाधिक गडद असतानाही त्या ठिकाणी नियंत्रण मिळविण्यात यश आले. हाच अनुभव पाठीशी घेऊन मुख्यमंत्री पुण्यात तातडीने निर्णय घेतील,  प्रशासकीय यंत्रणेला ॲक्शन प्लॅन देतील, आवश्यक तेथे तातडीने आर्थिक मदत जाहीर करतील, पुणेकरांना धीर देतील असे अपेक्षित होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी केवळ सूचनांची खैरात केली.

Image

पुण्यात जम्बो हॉस्पिटल उभारण्यासाठी निधी द्यावा, अशी मागणी महापौरांनी केली होती. त्यावर राज्यशासन आर्थिक मदत करेल, असे केवळ आश्वासन देण्यात आले. खरेतर मुख्यमंत्री, अर्थमंत्री या बैठकीस उपस्थित होते, त्यामुळे त्यांना तातडीने निधीची घोषणा करता आली असती, पण ते झाले नाही. प्रशासकीय पातळीवर मोठ्या प्रमाणावर रुग्णांच्या आकडेवारी वरून गोंधळ सुरू आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे नियोजन होत नसल्याचेही ही बैठकीच्या निमित्ताने स्पष्ट झाले. त्यावरही तातडीने निर्णय होऊन प्रशासकीय पातळीवर सुधारणा करण्याचे आदेश अपेक्षित होते. ससून रुग्णालयात डॉक्टरांच्या अपुर्‍या संख्येपासून अनेक विषय प्रलंबित आहेत, त्याबाबतही या बैठकीत लक्ष दिले गेले नाही.

Image

मुख्यमंत्री पुण्यात आल्याने प्रशासकीय यंत्रणा वेगाने काम करेल असे अपेक्षित आहे. पण बैठकीतून सध्यातरी  फारसे काही हाती लागले नाही, हे निश्चित. तोपर्यंत पुणेकरांना स्वतःची लढाई स्वतः लढावी लागेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sambhaji Patil Writes about CM Uddhav Thackreay Pune visit