Vidhan Sabha 2019 : या वेळी 'फक्त' बोटच काळं करणार! 

संभाजी पाटील  @psambhajisakal 
रविवार, 20 ऑक्टोबर 2019

Vidhan Sabha 2019 : पुणे : "पुण्यात मतदान झाले 50 टक्के; पण इतरांना अक्कल शिकवायचे प्रमाण शंभर टक्के', "पुणे मतदानात उणे', "अर्धे पुणे झोपले..!' मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतर सर्वाधिक चर्चा झाली ती पुणेकरांच्या निरुत्साहाची. परिणामी, सोशल मीडियावरही पुणेकर नेटकऱ्यांच्या "ट्रोलिंग'चे धनी ठरले. विधानसभा निवडणुकीचे मतदान सोमवारी (ता. 21) होणार आहे. त्यासाठी तरी पुणेकर निश्‍चितच घराबाहेर पडतील, अशी अपेक्षा आहे. "पुणेकर फक्त मतदानाला बाहेर पडत नाहीत, तर सक्षम उमेदवारही विजयी करतात' हे दाखवून देण्याची ही अनमोल संधी आहे. अन्यथा व्यवस्था, सक्षम लोकशाही आणि लोकप्रतिनिधींच्या कामकाजावर कोणाला काहीही बोलण्याचा काहीही हक्क उरत नाही, हे पक्‍कं डोक्‍यात ठेवायला हवं. 

Vidhan Sabha 2019 : पुणे : "पुण्यात मतदान झाले 50 टक्के; पण इतरांना अक्कल शिकवायचे प्रमाण शंभर टक्के', 'पुणे मतदानात उणे', 'अर्धे पुणे झोपले..!' मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतर सर्वाधिक चर्चा झाली ती पुणेकरांच्या निरुत्साहाची. परिणामी, सोशल मीडियावरही पुणेकर नेटकऱ्यांच्या 'ट्रोलिंग'चे धनी ठरले. विधानसभा निवडणुकीचे मतदान सोमवारी (ता. 21) होणार आहे. त्यासाठी तरी पुणेकर निश्‍चितच घराबाहेर पडतील, अशी अपेक्षा आहे. "पुणेकर फक्त मतदानाला बाहेर पडत नाहीत, तर सक्षम उमेदवारही विजयी करतात' हे दाखवून देण्याची ही अनमोल संधी आहे. अन्यथा व्यवस्था, सक्षम लोकशाही आणि लोकप्रतिनिधींच्या कामकाजावर कोणाला काहीही बोलण्याचा काहीही हक्क उरत नाही, हे पक्‍कं डोक्‍यात ठेवायला हवं. 

निवडणूक हा लोकशाहीचा गाभा आहे. आपलं सरकार ज्यांच्या हातात द्यायचं आहे, त्यांच्या निवडीची ही प्रक्रिया त्यासाठीच अतिशय महत्त्वपूर्ण आहे. उगाच "कोणीही निवडून येऊ दे, मला काय फरक पडतो,' या म्हणण्याला संसदीय लोकशाही प्रणालीत काहीही अर्थ नाही. उलट ही अनास्थाच अस्वस्थेला जबाबदार ठरते. त्यामुळे मतदानाच्या प्रक्रियेपासून दूर राहणार नाही, कोणत्याही कारणासाठी मतदान करण्याचे राहून जाणार नाही, हे प्रत्येकाला पाहावेच लागेल. कारण, 50 टक्के मतदानातून विजयी होणारा लोकप्रतिनिधी तुमच्या इच्छा, अपेक्षा, आकांक्षांना न्याय देईलच असं नाही. त्यामुळे मतदानाचा टक्का वाढवणं, ही जशी राजकीय पक्षांची, प्रशासकीय यंत्रणेची जबाबदारी आहे, तशीच जबाबदारी कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची आहे. ही निवडणूक अनेक अर्थांनी महत्त्वाची आहे. त्यामुळे पुणेकर जबाबदारी ओळखून मतदानाचा टक्का वाढवतील, अशी खात्री बाळगायला हरकत नाही. 

लोकसभेची निवडणूक मे महिन्यात झाली. त्या वेळी कडक उन्हं असल्यानं मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम झाल्याचं सांगण्यात आलं. झोपडपट्टीत 'लक्ष्मीदर्शन' झालं नाही, असाही आरोप झाला; तर अनेकांनी मतदानाला यायचं होतं. पण, यादीत नावच नव्हतं किंवा यादीत घोळ झाला. त्यामुळे मतदानापासून वंचित राहावं लागलं, असं रडगाणं गायलं. आता मतदानाच्या दिवशी पाऊस आला तर आम्ही पावसाचं कारण देणार का? मतदान करायची इच्छा असणारे शंभर वर्षं वयाचे, दिव्यांग, दृष्टिहीन, रुग्ण मतदानासाठी मोठ्या उत्साहानं बाहेर पडत असतील तर आपण बाहेर पडायलाच हवं. मतदारयादीत नाव आहे का, मतदान केंद्र कुठं आहे, या सर्वांची माहिती आता निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. सहा महिने आयोग दिवस-रात्र मतदार याद्या अपडेट, नावनोंदणीच्या कामात होते. त्याची पुरेशी प्रसिद्धीही करण्यात आली. यंदा विधानसभानिहाय मतदार चिठ्ठ्यांचे वाटप नीट व्हावं, यासाठी संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या (बीएलओ) नाव, नंबरसह यादी वृत्तपत्रात प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे एक दिवस आपल्या हाती आहे, आपली मतदार चिठ्ठी ताब्यात घ्या. म्हणजे, मतदानापासून वंचित राहावं लागणार नाही. 

पुण्यातील हडपसर मतदारसंघात सर्वाधिक पाच लाख मतदार आहेत. त्यापाठोपाठ खडकवासला मतदारसंघात 4.86 लाख मतदार आहेत. ही संख्या सांगण्याचं कारण एवढंच, की लोकसभा निवडणुकीत हडपसरमध्ये केवळ 47 टक्के मतदान झालं होतं. हीच अवस्था वडगाव शेरी, शिवाजीनगर आणि पुणे कँटोन्मेंटचीही आहे. हे सर्व मतदारसंघ अत्यंत महत्त्वाचे आहेत. यात जर मतदानाचा टक्का आणखी घसरला तर तुम्हाला अपेक्षित असणारा उमेदवार विजयी होणं अवघड आहे. त्यामुळे कोणतेही कारण न देता मतदानासाठी बाहेर पडू आणि टीकाकारांना उत्तर देऊ "पुणेकर तोंड नाही, तर बोट काळं करतात!' 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sambhaji Patil Writes about Pune Vidhna Sabha Election 2019