"देर से' पण "दुरुस्त' या!

-संभाजी पाटील
Sunday, 10 January 2021

पुण्यातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी पीएमपीशिवाय दुसरा पर्याय नाही. यातही खासगी वाहनांची संख्या कमी करून प्रवाशांनी पीएमपीकडे वळावे, अशी अपेक्षा असेल तर बसची उपलब्धता, आरामदायी सुविधा, फक्त बससाठीचे स्वतंत्र जलदगती मार्ग, असे पर्याय निवडावेच लागणार आहेत. बीआरटी हा त्यातील एक जगमान्य पर्याय आहे.

पुणे : बीआरटी (बस रॅपिड ट्रान्झिट) मार्ग सुरू करण्यास तसाही उशीर झालाच आहे. घाई गडबडीत आणि सुरक्षिततेची पुरेशी काळजी न घेता "बीआरटी' सुरू केल्याने पुणेकरांसाठी आवश्‍यक असणारी ही योजनाच बदनाम झाली! त्यामुळे पुन्हा एकदा बीआरटी सुरू करताना सुरक्षेसह सर्व प्रकारे तिचे ऑडिट व्हायला हवे. एकदा सुरू झालेला हा मार्ग कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी, तरच "बीआरटी'चा खरा उद्देश सफल होईल.

"स्वारगेटवरून कात्रजला फक्त पंधरा मिनिटात विना अडथळा पोहोचू शकता', असे आता कोणी म्हटले तर विश्‍वास बसणार नाही, पण हे शक्‍य आहे. शास्त्रशुद्ध पद्धतीने बीआरटी चालवली तर हे शक्‍य आहे. यापूर्वीही बीआरटीने जलद आणि सुखद प्रवासाचे स्वप्न काही काळापुरते तरी पूर्ण करून दाखविले होते. पण बीआरटी मार्गात आपण एवढे अडथळे निर्माण केले की, कात्रज-स्वारगेट आणि स्वारगेट-हडपसर बीआरटी मार्ग केवळ टीकेचा विषय बनला.

अखिल मंडई मंदिर चोरी तपासाला वेग; पोलिसांची तीन पथके चोरट्याच्या मागावर​

पुण्यातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी पीएमपीशिवाय दुसरा पर्याय नाही. यातही खासगी वाहनांची संख्या कमी करून प्रवाशांनी पीएमपीकडे वळावे, अशी अपेक्षा असेल तर बसची उपलब्धता, आरामदायी सुविधा, फक्त बससाठीचे स्वतंत्र जलदगती मार्ग, असे पर्याय निवडावेच लागणार आहेत. बीआरटी हा त्यातील एक जगमान्य पर्याय आहे. अहमदाबादसह अनेक शहरात आजही बीआरटी उत्तम प्रकारे सुरू आहे. दरवर्षी तेथील बीआरटी प्रवाशांची संख्या वाढत आहे. पण पुण्यात हा प्रयोग दुर्दैवाने यशस्वी होत नाही. याला आपली ध्येयधोरणे आणि धरसोड वृत्तीच कारणीभूत आहे.

अकराशे कोटींहून अधिक रुपयांचा निधी खर्च केल्यानंतरही सातारा रस्त्याचे काम अद्याप अपूर्ण आहे. बीआरटी मार्गातील त्रुटी दूर करण्यासाठी 2018पासून या मार्गाच्या बळकटीकरणाचे काम सुरू आहे, पण अद्याप ते पूर्णत्वास आले नाही. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी 1 जानेवारीपासून सातारा रस्त्यावरील बीआरटी सुरू करण्याची घोषणा केली. मात्र, आजही या मार्गावर फेरफटका मारला, तर हा मार्ग बीआरटी सुरू करण्यासाठी सुरक्षित असल्याचे वाटत नाही. सहा किलोमीटरच्या या रस्त्यावर अनेक ठिकाणी पक्‍चंर आहेत. बीआरटीचे बसथांबे धोकादायक आहेत. बसथांब्यांपर्यंत येण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी प्रवाशांना जीव मुठीत घेऊन दोन्ही बाजूंचा वाहता रस्ता ओलांडावा लागणार आहे. जे बसथांबे उभारले आहेत, त्यांना सुरक्षिततेसाठी दरवाजे बसविण्यात आले नाहीत.

दहावी पास विद्यार्थ्यांनो, ITI ऍडमिशनसाठी करा ऑनलाइन अर्ज; वाचा सविस्तर​

बीआरटीमधून पीएमपीची बससेवा सुरू करण्याची कसलीही तयारी झालेली नाही. बसचे वेळापत्रक डिस्प्ले करणारी यंत्रणा उभारण्यात आलेली नाही. झेब्रा क्रॉसिंग, सिग्नल सिंक्रोनायझेशन करण्यात आलेले नाही. बीआरटी मार्गात दुसरी कोणतीही वाहने घुसणार नाहीत, यासाठीची आवश्‍यक यंत्रणा उभारण्यात आलेली नाही. या मार्गावरून किती आणि कोणत्या बसगाड्या धावतील याची निश्‍चितता नाही, असे असताना बीआरटी सुरू करण्याची घोषणाच कशी झाली हे समजत नाही.

यापूर्वी बीआरटी मार्गावर झालेल्या अपघातात मृत्यूचे प्रमाण मोठे आहे. हा अनुभव लक्षात घेता या मार्गाच्या सुरक्षिततेबाबत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी (आयआयटी) पवई सारख्या संस्थेकडून ऑडिट व्हायला हवे. स्वारगेट हा पायलट प्रकल्प नव्याने यशस्वी करू शकलो, तरच शहरातील प्रस्तावित 110 किलोमीटरचे मार्ग विकसित करता येतील. नगर रस्ता, हडपसर, आळंदी आणि पिंपरी-चिंचवडमधील आठ मार्ग यशस्वीपणे चालविण्याचा आत्मविश्‍वास वाढेल. बीआरटीची शहराला गरज आहे. केवळ आपल्याला योग्य पद्धतीने अंमलबजावणी करता येत नाही, म्हणून योजनाच चुकीची असा सूर काढता कामा नये.

संभाजी भिडे सात वर्षांनंतर वढूमध्ये आले आणि लगेच निघूनही गेले​

आधी हे करा
-संपूर्ण मार्गाचे सेफ्टी ऑडिट करावे
- बसस्थानकांना दरवाजे हवेत
- बसस्थानकावर प्रवाशांना येण्यासाठी सुरक्षित मार्ग
-सिग्नलचे सिंक्रोनायझेशन
- उत्तम दर्जाच्या बसगाड्या

सद्यःस्थितीत बीआरटी
- 110 किलोमीटरचे मार्ग प्रस्तावित
- हडपसर आणि सातारा रस्त्यावरील बीआरटी सध्या बंद
- मेट्रो कामासाठी नगर रस्त्यावरील बीआरटी बंद
- पिंपरीत चार मार्ग अंशत: सुरू

- पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे - क्लिक करा

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sambhaji patil Writes articles About Failure of BRT project in pune