
Sambhaji Raje : कुत्रा,मांजर, खोके, बोक्यापुरतेच महाराष्ट्राचे राजकारण मर्यादित का?
पुणे : सध्या राज्यातील राजकारणाची पातळी खुपच घसरली आहे. त्यामुळे रोज सकाळी कोणी कोणाला कुत्रा, कोणी मांजर तर, कोणी खोके, बोके म्हणत एकमेकांवर आरोप करत आहेत. यावरून राज्याचे राजकारण हे केवळ कुत्रा, मांजर, खोके, बोक्यापुरतेच आहे का?
असा सवाल करत सर्वसामान्यांच्या विकासाबाबत कधी बोलणार आहात, असा प्रश्न छत्रपती संभाजीराजे यांनी शनिवारी (ता.२७) पुण्यात एका जाहीर कार्यक्रमात बोलताना राज्यातील सत्ताधाऱ्यांना विचारला.
सध्या महाराष्ट्रातील सत्ताधारी हे परदेशात जाऊन उद्योगांबाबतचे सामंजस्य करार (एमओयू) करत आहेत. पण या करारांपैकी किती उद्योग प्रत्यक्षात राज्यात आले. त्यापैकी किती उद्योग सुरु झाले, यावर भाष्य करत नाहीत.
याउलट महाराष्ट्रातील उद्योग सातत्याने राज्याबाहेर जात आहेत. यामुळे महाराष्ट्राचा विकास खुंटला असून, देशातील अन्य मागास राज्यांचा मात्र वेगाने विकास होत असल्याचे स्पष्ट करत, महाराष्ट्रातील उद्योग राज्याबाहेर का जात आहेत, याचे कधी आत्मचिंतन करणार आहात, असा प्रश्न छत्रपती संभाजीराजे यांनी यावेळी उपस्थित केला.
स्वराज्य संघटनेच्या पहिल्या अधिवेशनासाठी ते पुण्यात आले होते. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हा सवाल केला. ते पुढे म्हणाले, ‘‘ राज्यात सध्या तेच तेच राजकारणी, तीच तीच चर्चा आणि तेच ते खोटं बोलणं पाहायला मिळत आहे.
पण आता आता हे चालणार नाही. सामान्य, शेतकरी, कष्टकरी यांना ताकद देण्याचे काम करायचे आहे. ही ताकद देण्यासाठी सत्ताधाऱ्यांना याबाबत जाब विचारण्याची वेळ आली आहे. हा जाब आता आपल्याला मतपेटीच्या माध्यमातून विचारावा लागणार आहे.
याबाबत सरकारला जाब विचारण्याची आणि आत्मचिंतन करण्याची वेळ आलेली आहे. राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतिराव फुले, सावित्रीबाई फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, पंजाबराव देशमुख आदींनी सर्वसामान्यांना शिक्षण, रोजगार आणि स्वयंरोजगार देण्यासाठी कार्य केले. मात्र सध्या बरोबर उलटे घडू लागले आहे.
सर्व प्रमुख उद्योगपती हे महाराष्ट्रातील असतानासुद्धा उद्योग राज्याबाहेर चालले आहेत. आपल्याकडे हे सगळे असताना उद्योग बाहेर का जात आहेत. मागास राज्य पुढे जात असून महाराष्ट्र मागे पडत आहे. सहकार हा आता लोकांचा राहिलेला नसून राजकारणाचा अड्डा बनला आहे. मांजर, कुत्रा, खोके, बोके हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे का? आपण सुसंस्कृत महाराष्ट्र घडवू. समाजाला योग्य दिशा देऊ.’’
‘समविचारी पक्षांशी युती करणार’
येत्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात स्वराज्य संघटना पूर्ण ताकदीने उतरणार आहे. या निवडणुकीसाठी युती करण्यासाठी आम्ही स्वतःहून कोणाकडे जाणार नाही. परंतु कोणी समविचारी पक्ष आमच्याकडे युती करण्यासाठी आले तर, आम्ही त्यांच्याशी युती करू. आमच्या दृष्टीने देशहित पाहणारा म्हणजे समविचारी पक्ष आहे.
त्यामुळे देशहित हाच स्वराज्य संघटनेचा अजेंडा असणार आहे. सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी, त्यांची कामे करण्यासाठी स्वराज्य' काम करणार आहे. स्वराज्य आणि इतर पक्षांमध्ये असलेला फरक लोकांना लक्षात येईल, असे काम आम्ही करणार असल्याचे छत्रपती संभाजीराजे यांनी यावेळी स्पष्ट केले. यापुढील काळात स्वराज्य हा सक्षम पर्याय म्हणून पुढे येणारच. सध्या आम्ही विस्थापित आहोत. मात्र त्यासाठी घाबरण्याची गरज नाही.एखादा नेता सुसंस्कृत असेल तर, तो आपल्यासोबत स्वराज्य संघटनेत स्वतःहून येईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.