भराल तितकीच रक्कम काढण्याची मुभा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 डिसेंबर 2016

पुणे - भारतीय रिझर्व्ह बॅंकेने खात्यातून रक्कम काढण्यावरील मर्यादा उठविताना अटही घातली असल्याची माहिती पुढे आली आहे. या अटीनुसार सध्या चलनात वापरात असलेल्या पाच, दहा, वीस, पन्नास, शंभर आणि पाचशे, दोन हजार रुपयांच्या नवीन नोटा बॅंक खात्यात भरल्यानंतर तेवढीच रक्कम खात्यातून काढता येणार आहे.

पुणे - भारतीय रिझर्व्ह बॅंकेने खात्यातून रक्कम काढण्यावरील मर्यादा उठविताना अटही घातली असल्याची माहिती पुढे आली आहे. या अटीनुसार सध्या चलनात वापरात असलेल्या पाच, दहा, वीस, पन्नास, शंभर आणि पाचशे, दोन हजार रुपयांच्या नवीन नोटा बॅंक खात्यात भरल्यानंतर तेवढीच रक्कम खात्यातून काढता येणार आहे.

सोमवारी रिझर्व्ह बॅंकेने बॅंक खात्यातून रक्कम काढण्यावर घातलेली बंदी मागे घेतल्याचे जाहीर केले; परंतु याबाबत बॅंकांना मिळालेल्या परिपत्रकानुसार निर्बंध पूर्णपणे उठविले नसल्याचे स्पष्ट होत आहे. याबाबत शारदा सहकारी बॅंकेचे कार्यकारी संचालक रवींद्र शेंडे यांनी "सकाळ'ला माहिती दिली. ते म्हणाले, ""सध्या चलनात असलेल्या पाच, दहा, वीस, पन्नास, शंभर आणि पाचशे, दोन हजार रुपयांच्या नवीन नोटा जेवढ्या प्रमाणात खातेदार बॅंकेत जमा करेल, तेवढीच रक्कम त्याला खात्यातून काढता येणार आहे. या संदर्भात सविस्तर माहिती पुढे न आल्याने खातेदारांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली. बॅंकांकडेही नवीन चलनाचा तुटवडा असल्याने त्या खातेदाराला त्याच्या मागणीएवढी रक्कम देऊ शकत नाहीत हीदेखील वस्तुस्थिती आहे.'' सुटे पैसे चलनात यावेत, त्याचा साठा होऊ नये, असा हेतू या निर्णयामागे असावा, असेही बोलले जात आहे.

सहकारी बॅंकांचे निवेदन आणि इशारा
शहरात "करन्सी चेस्ट'असलेल्या बॅंकांनाही नवीन चलन त्यांच्या गरजेएवढे मिळत नाही. यामुळे या बॅंकांवर अवलंबून असलेल्या बॅंकांमधूनही खातेदारांना पुरेशा प्रमाणात चलन दिले जात नसल्याचे चित्र बुधवारी दिसत होते. चलन तुटवड्याचा फटका सहकारी बॅंकांना बसला आहे. खातेदारांच्या रोषाला त्यांना सामोरे जावे लागत आहे. याबाबत पुणे जिल्हा नागरी सहकारी बॅंक्‍स असोसिएशनच्या शिष्टमंडळाने बुधवारी जिल्हाधिकारी सौरभ राव यांना निवेदन दिले. अध्यक्ष ऍड. सुभाष मोहिते, आमदार अनिल भोसले, महाराष्ट्र बॅंक्‍स फेडरेशनचे अध्यक्ष बाळासाहेब अनास्कर आदींनी बॅंकांसमोरील अडचणी राव यांना सांगितल्या. सहकारी बॅंकांना मिळणारी सापत्न वागणूक थांबवा, दोन दिवसांत परिस्थिती सुधारली नाही तर आंदोलन करावे लागेल, असा इशाराही या वेळी देण्यात आला. नोटाबंदीनंतर पतसंस्थांवर टाकण्यात आलेल्या निर्बंधाच्या निषेधार्थ पुणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्थेचे सहकारी फेडरेशनने काळी फीत लावण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने पतसंस्थांकडे जमा रकमेची शहानिशा करावी, असेही फेडरेशनचे अध्यक्ष अनिल भोसले यांनी नमूद केले.

रांगा कायम, गर्दी कमी
एटीएम केंद्रासमोर रांगा बुधवारीही कायम होत्या. नोटाबंदीनंतर शहरातील बहुतेक बॅंकांची एटीएम केंद्रे बंदच ठेवण्यात आली होती. ती केंद्रे नवीन चलन उपलब्ध झाल्याने परिस्थिती टप्प्याटप्प्याने थोडी सुधारली आहे. महिनाअेखर आणि महिन्याचा पहिला आठवडा सुरू होत असल्याने, या काळात कामगारांचे वेतन, घरगुती बिले, घरकामगारांचे वेतन देण्यासाठी नागरिक बॅंकांत पैसे काढण्यासाठी येत आहेत. बॅंकेत उपलब्ध रकमेनुसार प्रत्येक खातेदाराला दोन, चार, सहा, आठ हजार रुपयेच मिळत आहेत. कमी पैसे मिळाल्याने खातेदार दुसऱ्या दिवशी पुन्हा बॅंकेत, एटीएम केंद्रांत पैशासाठी जात आहेत. दरम्यान, जन-धन योजनेंतर्गत खात्यावरील रक्कम काढण्यावरही मर्यादा घालण्यात आली आहे. पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यात एकूण साडेचौदा लाख खाती या योजनेंतर्गत उघडण्यात आली आहेत.

ग्राहक पेठेत स्वीकारणार जुन्या नोटा
रिझर्व्ह बॅंकेच्या परिपत्रकानुसार ग्राहक पेठेत ग्राहकांकडून 500 रुपयांच्या जुन्या नोटा स्वीकारल्या जाणार आहेत. त्यासाठी खरेदीसाठी पाच हजार रुपयांपर्यंतची मर्यादा घालण्यात आली आहे. ग्राहक पेठेत 1 ते 15 डिसेंबर या कालावधीत सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत होणाऱ्या खरेदीवर या नोटा स्वीकारल्या जातील, अशी माहिती कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक यांनी कळविली आहे. खरेदीसाठी येताना ग्राहकांनी पॅन कार्ड, आधार कार्डची स्वसाक्षांकित (सेल्फ ऍटेस्टेड) प्रत आणावी, असेही त्यांनी नमूद केले आहे.

Web Title: same amount of latitude removal