77 वर्षांनंतरही टिकून असलेलं मऱ्हाटी माणसाचं काम तुम्हाला माहितीय?

77 वर्षांनंतरही टिकून असलेलं मऱ्हाटी माणसाचं काम तुम्हाला माहितीय?

डॉ. सुभाष साळुंखे यांच्याशी भेट झाली, म्हणून भोरे समिती पुन्हा कानावर पडली. काही वर्षांपूर्वी स्टोरीच्या निमित्तानं अशीच कानावर येऊन विरून गेलेली भोरे समिती. डॉ. साळुंखेंच्या बोलण्यात भोरे समितीचा उल्लेख आग्रहानं आला. डॉ. साळुंखे महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातले बुजूर्ग. सार्वजनिक आरोग्याची खडान् खडा माहिती. आकडे तोंडपाठ. वय फक्त 73 वर्षे. महाराष्ट्रानं कोरोनाच्या आपत्कालिन परिस्थितीशी लढण्यासाठी डॉ. साळुंखेंना आरोग्य सल्लागार म्हणून नियुक्त केलंय. एक रुपया न घेता डॉक्टर पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत काम करताहेत.

कोरोना शहरांत वाढलाय, ग्रामिण भाग कसा सुरक्षित राहिलाय या प्रश्नावर डॉ. साळुंखेंनी मांडलं: ग्रामिण भागात किमान प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. भोरे समितीनं ते काम करून ठेवलंय. शहरांसाठी सार्वजनिक आरोग्याचं धोरणच नाहीय. कोरोना शहरांमध्ये वाढला, कारण शहरांमध्ये सार्वजनिक आरोग्य व्यवस्थाच उभी राहिलेली नाही. भोरे समितीचं काम आभाळाएवढं होतं. आज 77 वर्षांनंतरही त्याच पायावर भारताचा, महाराष्ट्राचा ग्रामिण सार्वजनिक आरोग्याचा ढाचा उभा आहे. एका मराठी माणसानं करून ठेवलेल्या या आभाळाएवढ्या कामाची ओळख व्हायला हवी.

भोरे कोण...?
भारताची सार्वजनिक आरोग्य व्यवस्था 1946 च्या भोरे समितीच्या शिफारसींवर आधारित आहे. सर जोसेफ विल्यम भोरे जन्मानं नाशिककर. रावसाहेब आर. जी भोरे यांचे ते पूत्र. भोरे शिकले पुण्यातल्या बिशप्स हायस्कूल आणि डेक्कन कॉलेजामध्ये आणि त्यानंतर लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेजात. तत्कालिन इंडियन सिव्हिल सर्व्हिसमध्ये 1902 मध्ये ते दाखल झाले. मद्रास केडरमध्ये त्यांनी काम केलं. कोचीच्या राजाचे ते दिवाण होते. शेती-जमीन, उद्योग-कामगार, रेल्वे-व्यापार ही त्यांची कामाची क्षेत्रं. त्यातल्या कामाबद्दल त्यांना ब्रिटीश सरकारनं नाईट कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ इंडिया ही पदवी बहाल केलेली. त्यांची पत्नी मार्गारेट स्टॉट. 1878 ला जन्मलेल्या डॉ. भोरे यांचा मृत्यू 15 ऑगस्ट 1960 चा.

भोरे समितीची स्थापना
भारताच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांचे डॉ. भोरे शिल्पकार. तत्कालिन भारताला डोळ्यासमोर ठेवून त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रांची रचना ग्रामिण भागात उभी केली. ती आजही कायम आहे. दुसरं महायुद्ध संपत असतानाच भारतात चले जाव चळवळ सुरू होती. याच सुमारास 18 ऑक्टोबर 1943 ला ब्रिटीश सरकारनं द हेल्थ सर्व्हे अँड डेव्हलपमेंट कमिटी स्थापन केली. समितीच्या प्रमुखपदाचं काम डॉ. भोरेंना दिलं आणि याच कमिटीचं नाव नंतर डॉ. भोरे कमिटी म्हणून नोंदवलं गेलं.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे - क्लिक करा

समितीच्या कार्यकक्षा
ब्रिटीश सरकारनं भोरे समितीला दोन कामं दिली होती. पहिलं: भारतातल्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचं सर्वेक्षण करून वर्तमान परिस्थिती मांडणं, दुसरं: भविष्यातल्या विकासासाठी शिफारसी करणं. भोरे समितीनं सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय मदत, व्यावसायिक शिक्षण, वैद्यकीय संशोधन आणि औद्योगिक आरोग्य अशी यंत्रणांचा अभ्यास केला. अवघ्या 26 महिन्यात 206 पॅरामीटर्सवर अख्खा अखंड भारत पिंजून काढून तीन खंडात आपला अहवाल दिला. आसाम आणि बलुचिस्तान वगळता तत्कालिन सर्व भारतीय हद्दींचा समावेश अहवालात होता.

उपयुक्त माहिती
भारताच्या सार्वजनिक आरोग्याबद्दल भाष्य करण्यापूर्वी भोरे यांनी जगातील तेव्हाच्या महत्वाच्या राष्ट्रांच्या सार्वजनिक आरोग्याचाही अभ्यास केला. भारताचा मृत्यूदर 22.4 आणि न्यूझिलंडचा 7.1, इंग्लंड आणि वेल्समध्ये 12.1, अमेरिकेत 11.2, कॅनडात 10.2 होता. जन्माला आलेल्या बालकांचं मृत्यूचं प्रमाण भारतात 162 होते. इंग्लंड-वेल्समध्ये 58, न्यूझिलंडमध्ये 31, अमेरिकेत 54 आणि कॅनडात 76 होतं. सरासरी आयुर्मान भारतात 26.91 वर्षे होतं. भोरे समितीनं 1921 ते 1943 पर्यंतच्या डेटा संदर्भ म्हणून घेतला.

भोरेंच्या शिफारसी
भोरे समितीनं प्रामुख्यानं दोन टप्प्यांमध्ये विभागता येतात. त्यांनी कुठल्याही रोगाच्या प्रतिबंधाची आणि रोग आल्यावरच्या उपाययोजनांची व्यवस्था प्रशासकीय व्यवस्थेचा भाग बनविण्यास सुचवलं. प्रत्येकी चाळीस हजारांच्या लोकसंख्येसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांची (पीएचसी) व्यवस्था सुचविली. प्रत्येक पीएचसीसाठी दोन डॉक्टर, एक नर्स, चार सार्वजनिक नर्सेस, चार आया, चार दाया, दोन स्वच्छता अधिकारी, दोन सहाय्यक, एक फार्मसिस्ट आणि 15 चतुर्थ श्रेणी कर्मचारी अशी रचना सुचविली. दीर्घकालीन उपायायोजनांमध्ये त्यांनी दहा हजार ते वीस हजार लोकसंख्येसाठी 75 खाटांचे प्राथमिक उपचार केंद्र आणि तालुक्याच्या ठिकाणी 650 खाटांचं रुग्णालय असं सुचवलं. जिल्ह्याच्या ठिकाणी 2500 खाटांचं रुग्णालय भोरे समितीनं प्रस्तावित केलं होतं. वैद्यकीय शिक्षणात प्रत्येक विद्यार्थ्याला किमान तीन महिन्यांचं रोगप्रतिबंधक व्यवस्थेचं प्रशिक्षण प्रस्तावित होतं. त्यासाठी त्यांनी 'सोशल फिजिशियन' असा शब्द वापरला होता.

आजची परिस्थिती
भोरे समितीच्या शिफारसींच्या बळावर आजचा भारत उभा आहे. ग्रामिण भागात देशभरात आजघडीला 25650 प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. दर 54 हजार माणसांमागे एक, अशी ही रचना आहे. मात्र, या केंद्रांवर कर्मचाऱ्यांची वानवा आहे. फक्त महाराष्ट्राचा विचार केला, तर 2001 च्या जनगणनेनुसार जेवढी आरोग्य व्यवस्था पाहिजे, त्याच्या 60 टक्के उपलब्ध आहे. उर्वरित जागा 'रिक्त' नावाच्या रकान्यात आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com