वाळूचोरांवरील कारवाई संशयास्पद

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 डिसेंबर 2018

दौंड - वन विभागाने नायगाव (ता. दौंड) येथे वाळूचोरांविरुद्ध केलेल्या कारवाईबाबत संशय व्यक्त केला जात आहे. या वेळी नऊ वाहने जप्त करण्यात आलेली असताना एकालाही ताब्यात घेण्यात आलेले नाही. वाळूचोर आणि ट्रकचालकांना पळून जाण्याची मुभा दिल्याची चर्चा आहे. 

दौंड - वन विभागाने नायगाव (ता. दौंड) येथे वाळूचोरांविरुद्ध केलेल्या कारवाईबाबत संशय व्यक्त केला जात आहे. या वेळी नऊ वाहने जप्त करण्यात आलेली असताना एकालाही ताब्यात घेण्यात आलेले नाही. वाळूचोर आणि ट्रकचालकांना पळून जाण्याची मुभा दिल्याची चर्चा आहे. 

वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण १२ वन अधिकारी व कर्मचारी आणि राज्य राखीव पोलिस दलाचे एकूण १२ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी १८ डिसेंबर रोजी नायगाव येथे वाळूचोरांविरुद्ध संयुक्त कारवाई केली. वन विभागाच्या जागेतून भीमा नदीतून वाळूचोरी व वाहतूक करताना काही ट्रकचालक आणि वाळूचोरांना पकडण्यात आले होते. पण, नंतर त्यांना सोडून देण्यात आले होते. राज्य राखीव पोलिस दलाची तुकडी सोबत असल्याने आणि पळून जाण्याच्या संभाव्य मार्गांवर पोलिस तैनात असतानाही ट्रकचालक, क्‍लीनर आणि वाळूचोर पळून गेल्याने या कारवाईविषयी शंका निर्माण झाली आहे. 

दौंड तालुक्‍यातील वन विभागाच्या जमिनीलगतच्या नदी पात्रातून राजरोस वाळूचोरी सुरू आहे. ती वाहून नेण्यासाठी वाळूचोरांनी वनसंपदा नष्ट करून वनातून जेसीबी यंत्रांच्या साह्याने रस्ते तयार केले आहेत. संबंधित वन अधिकाऱ्यांना या रस्त्यांविषयी माहिती आहे; परंतु कारवाई केली जात नसल्याची चर्चा आहे.

चोरीच्या भीतीने वाहने बारामतीत 
वन विभागाने वाळूचोरी करून त्याची वाहतूक करण्यासाठी वापरले जाणारे दोन जेसीबी यंत्र, सहा ट्रक व दोन दुचाकी, अशी एकूण एक कोटी रुपये किमतीची वाहने या कारवाईत जप्त केली आहेत. दौंड येथे संगनमताने वनजमिनीतून सुरू असलेल्या वाळूचोरीप्रमाणे जप्त केलेली वाहनेदेखील चोरीस जाण्याची भीती असल्याने ती बारामती येथील वन कार्यालयात जमा करण्यात आली आहेत.

ट्रकचालक व इतर लोक पळून गेल्याने आमच्या कर्मचाऱ्यांनी ही वाहने बारामती येथे जमा केली आहेत. जप्त वाहनांच्या चासी क्रमांकाच्या आधारे ट्रकमालकांची माहिती देण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयास पत्र देण्यात आले आहे. त्यांच्याकडून माहिती मिळताच पुढील कारवाई करण्यात येईल. 
- महादेव हजारे, वन परिक्षेत्र अधिकारी, दौंड 

Web Title: Sand Theft Crime