संदीप सिन्हा यांच्या चित्राची गिनेस बुकमध्ये नोंद

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 मे 2019

पुण्यातील चित्रकार संदीप सिन्हा यांनी रेखाटलेल्या जगातील सर्वाधिक मोठ्या तैलचित्राची गिनेस बुकात नोंद झाली आहे. या विक्रमामुळे शहराच्या नावलौकिकात भर पडली आहे.  

पुणे - पुण्यातील चित्रकार संदीप सिन्हा यांनी रेखाटलेल्या जगातील सर्वाधिक मोठ्या तैलचित्राची गिनेस बुकात नोंद झाली आहे. या विक्रमामुळे शहराच्या नावलौकिकात भर पडली आहे.  

 सिन्हा यांनी रेखाटलेले हे तैलचित्र हिमालयाचे असून, त्याचा आकार ४८.७८ चौरस मीटर आहे. या चित्राने अमेरिकेतील चित्रकाराच्या  २२.४६ चौरस मीटर आकाराच्या चित्राचा याआधीचा विक्रम 
मोडला आहे. 

या संदर्भात सांगताना संदीप म्हणाले, ‘‘हे चित्र ॲसिड हल्ल्यातून वाचलेल्या महिलांना समर्पित केले आहे. हिमालय हा सर्व आव्हानांना तोंड देऊन खंबीर उभा असतो. तशाच हल्ल्यातून वाचलेल्या महिलाही निर्धाराने जीवनात उभ्या आहेत. या चित्राचे शीर्षक ‘हिमाखन’ आहे. त्याचा अर्थ हिमालयासारखा खंबीर मनाचा आणि लोण्यासारखा मृदू अंतःकरणाचा असा आहे. हे चित्र पूर्ण करायला अडीच महिने लागले. जागतिक विक्रमाच्या नियमानुसार असे चित्र एकच देखावा रेखाटलेले (सिंगल सीन) असावे लागते. त्यामुळे मी निसर्गाची प्रतीकात्मकता  आणि भव्यता रसिकांपर्यंत पोचवण्याच्या हेतूने माझ्या कलाप्रकारासाठी हिमालय पर्वतरांगा ही संकल्पना निवडली.’’ 

संदीप यांच्या चित्रांच्या २५ व २६ ऑक्‍टोबर २०१८ ला राजा रविवर्मा आर्ट गॅलरीमध्ये झालेल्या ‘आवाहन अवेकनिंग द गॉडेस विदीन’ या एकल चित्रप्रदर्शनात हे तैलचित्र प्रथम प्रदर्शित करण्यात आले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sandeep Sinha picture in the Guinness Book of Record