पिंपरीच्या पोलिस आयुक्तपदी बिष्णोई

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

- मावळते पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांची बदली

- संदीप बिष्णोई पिंपरीचे नवे पोलिस आयुक्त

पिंपरी (पुणे): पिंपरी-चिंचवडचे मावळते पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांची बदली झाली असून, त्याजागी संदीप बिष्णोई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश गृह विभागाने शुक्रवारी (ता. 20) काढले.  

बिष्णोई हे मुंबईत वैधमापनशास्त्र नियंत्रक म्हणून कार्यरत होते. पिंपरीत स्वतंत्र पोलिस आयुक्तालय स्थापन करण्याची अनेक दिवसांची मागणी होती. त्यानुसार पुणे शहर व ग्रामीण पोलिस दलाच्या हद्दीचे विभाजन करून 15 ऑगस्ट 2018 रोजी पोलिस आयुक्तालयाची निर्मिती करण्यात आली. आर. के. पद्मनाभन यांना पहिले आयुक्त होण्याचा मान मिळाला. 

दरम्यान, सेवानिवृत्तीसाठी अवघ्या काही दिवसांचा कालावधी शिल्लक असतानाच त्यांची बदली झाली. पद्मनाभन यांना बदलीचे ठिकाण अद्याप दिलेले नाही. पदस्थापनेबाबतचा आदेश नव्याने काढला जाणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sandip Bishnoi's new police commissioner of pimpri