सांगवी परिसर विनाआधार, नागरिकांची परवड

रमेश मोरे
गुरुवार, 17 मे 2018

माझे दोन वर्षांपासून नागरी सुविधा केंद्र सलग्न महा-ई सेवा केंद्र आहे. गेल्या वर्षभरापासून पालिकेकडून देण्यात आलेले आधार मशिन केवळ अपडेट नसल्याने मशिन बंद आहे.

- विश्वास चव्हाण, केंद्रचालक, नागरी सुविधा केंद्र, पिंपळे गुरव.

जुनी सांगवी : जुनी सांगवी परिसरात गेल्या दोन वर्षांपासून पिंपरी चिंचवड महापालिकेकडून देण्यात आलेल्या आधार मशिन धुळखात पडून आहेत. सध्या परिसरात आधार नोंदणी व दुरूस्तीसाठी नागरिकांना प्रभाग कार्यालय अथवा इतरत्र जावे लागत आहे. येथील नवी सांगवी, जुनी सांगवी, पिंपळे गुरव येथील महापालिकेने दिलेल्या आधार मशिन केवळ अपडेट नसल्याने बंद अवस्थेत धुळखात पडून आहेत.

नागरी सुविधा केंद्र, महा-ई सेवा केंद्राच्या नामफलकावर येथे आधारकार्ड करून मिळेल, असे लिहिलेले आढळते. नागरिक फलक पाहून आधार नोंदणीसाठी जातात. मात्र, मशिन बंद असल्याचे कारण समजल्यावर नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. 

सांगवी व परिसरात जवळपास दहा ते बारा नागरी सुविधा केंद्र आहेत. यामध्ये सांगवीत चार, पिंपळे गुरव येथे चार व अन्य भागात चार अशी नागरी सुविधा व महा-ई सेवा केंद्रे आहेत. तर खाजगी महा-ई सेवा सल्ला केंद्र ग्राहक सेवा केंद्राची व्यावसायिक केंद्रे या भागात आहेत. या सर्व केंद्रावरून डोमिसाईल, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, लाईट बिल भरणा, रेशनकार्ड, पॅनकार्ड पालिकेची विविध विभागाची कामे केली जातात. मात्र, आधार नसल्याने नागरिकांची तारांबळ होत आहे.

सध्या नवीन शाळा प्रवेश व विविध कामांसाठी आधार नोंदणी व नाव दुरूस्तीसाठी नागरिकांना गरज भासत आहे. अनेकांच्या आधारकार्डवर चुकीची नावे, पूर्ण जन्मतारीख नसणे, पत्त्यातील बदल, अस्पष्ट फोटो, मोबाईल नंबर लिंक करणे आदी दुरूस्त्यांसाठी नागरिकांना आधार मशिनची शोधाशोध करावी लागत आहे. 

सांगवी परिसरात ही उपलब्धता नसल्याने नागरिकांना शोधावे लागत आहे. सांगवी परिसरातील नागरी सुविधा केंद्रातून आधार नोंदणी, दुरूस्ती सुरू करण्यात यावी, अशी मागणी नागरीकांकडून होत आहे. याबाबत पालिका प्रशासनाकडे संपर्क साधला असता संपर्क झाला नाही.

Web Title: Sangavi Residents facing huge problems for Aadhar