ग्रामीण भागातील साहित्यिकांनी मराठी साहित्य समृद्ध केले- संगीता बर्वे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sangeeta barve news

ग्रामीण भागातील साहित्यिकांनी मराठी साहित्य समृद्ध केले- संगीता बर्वे

पुणे: पुणे हे विद्येचे आणि साहित्याचे माहेरघर आहे. या शहरामध्ये आपण विद्या ग्रहण करावी आणि साहित्यिक व्हावे, हे अनेकांचे स्वप्न असते. आज ग्रामीण भागातून अनेक साहित्यिक पुण्यामध्ये येऊन लेखन करत आहे. आपल्या मनातील दाहकता आणि वास्तविकता साहित्यातून प्रकट करीत आहे. त्यांच्या साहित्यातील वास्तविकपणा हाच सच्चेपणा आहे, याच ग्रामीण भागातून आलेल्या साहित्यिकांनी मराठी साहित्य खऱ्या अर्थाने समृद्ध केले, अशी भावना ज्येष्ठ साहित्यिका कवयित्री संगीता बर्वे यांनी व्यक्त केली.

वल्लरी प्रकाशनातर्फे संध्या राजन यांच्या नातीचरामी या लघुकथा संग्रहाचे आणि व्यंकटेश कल्याणकर संपादित मोगरा या काव्यसंग्रहाचे संगीता बर्वे यांच्या हस्ते प्रकाशन झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. ज्येष्ठ साहित्यिक देविदास फुलारी, ज्येष्ठ संपादक विद्याधर ताठे, किरण इनामदार, व्यंकटेश कल्याणकर आदी यावेळी उपस्थित होते.

व्यंकटेश कल्याणकर म्हणाले, यंत्र माणसं होत आहेत आणि माणूस यंत्र होत आहे, या पार्श्वभूमीवर आम्ही ‘मोगरा’सारख्या उपक्रमांमधून माणसांतील सजीवपण जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. एका अमराठी लेखिका मराठी साहित्यात देत असलेलं मौलिक योगदान ही मराठी माणसांना अभिमानाची बाब आहे. आम्ही मराठी प्रकाशन व्यवसायात प्रकाशक, साहित्यिक आणि वाचकांसाठी नवं काय आणता येईल, यासाठी आम्ही संशोधन करत आहोत. ई-बुक, ऑडिओ बुकसाठी नवी व्यासपीठं निर्माण करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.

संगीता बर्वे म्हणाल्या, अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील एका छोट्याशा खेडेगावातून मी पुण्यामध्ये आले. इतर साहित्यिकांप्रमाणेच पुण्यात आपले स्थान निर्माण करावे ही माझी इच्छा होती. अशाच प्रकारचे स्वप्न उराशी घेऊन अनेक ग्रामीण लेखक पुण्यामध्ये येऊन आपल्या मनातील साहित्य लोकांसमोर मांडू इच्छितात. या साहित्यिकांची मुळे खोलवर रुजलेली असतात, त्यामुळे ते पुण्यामध्ये स्थिरस्थावर होतात.

देविदास फुलारी म्हणाले, लेखकाने साहित्य आणि कविता निर्मितीचा आनंद घेतला पाहिजे. वेदना हे साहित्याचे मूळ स्थान आहे. या वेदनेतूनच मोठे साहित्य निर्माण होते. नवीन शब्दांची भाषेमध्ये भर पडली तर ती भाषा अधिक श्रीमंत होते. मराठी साहित्य विश्वाची ही शोकांतिका आहे की मोठ्या साहित्यिकांची पुस्तकेही विकली जात नाहीत, अशा वेळी नवीन कवींचे पुस्तक प्रकाशन करणे हे एक प्रकारे धाडसाचे काम आहे.

विद्याधर ताठे म्हणाले, संत साहित्य हे बोजड असते, असा गैरसमज आहे, परंतु संत साहित्य ही एक प्रकारे लयदार कविता आहे. हे साहित्य तरुणांपर्यंत विविध माध्यमातून पोहोचविले पाहिजे. अंतरंगातून उमटणारी कविता हे ईश्वरी काव्य आहे.

संध्या राजन म्हणाल्या, कर्नाटकामध्ये बालपण गेले असले तरी मला मराठीची पहिल्यापासूनच गोडी आहे. मराठी भाषा शिकून काही उपयोग नाही असे कर्नाटकमध्ये मला सांगितले जायचे. परंतु मराठी भाषेची गोडी मी आजही मनामध्ये कायम ठेवली असून मराठी भाषेमध्ये साहित्य निर्मिती करत राहणे हा माझा संकल्प आहे. त्यामुळे माझे व्यक्तिमत्व समृद्ध होण्यास मदत झाली आहे.

दीपा केळकर, पोर्णिमा ढेरे, मृण्मयी नारद, रूपाली इनामदार, सरोज भट, छाया नाळे, संध्या राजन, वर्षा जोशी, प्रज्ञा जोशी, आरती परळकर, स्वाती कुलकर्णी या कवियत्रींनी यावेळी आपल्या कविता सादर केल्या.

प्रकाश तांबे, डॉ. विनय देव, मानसी चिटणीस, अपूर्वा देव, समीर क्षीरसागर, गुरुप्रसाद कुलकर्णी, कीर्ती देसाई, किरण इनामदार, वैभवी देशपांडे, प्रज्ञा कल्याणकर, ज्योती इनामदार यांचा यावेळी सत्कार करण्यात आला, प्रज्ञा कल्याणकर यांनी सूत्रसंचालन केले. व्यंकटेश कल्याणकर यांनी प्रास्ताविक केले.

टॅग्स :Pune News