‘संघर्ष यात्रे’ला ‘संवादा’तून उत्तर - मुख्यमंत्री फडणवीस

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 एप्रिल 2017

पंडित दीनदयाळ उपाध्याय नगरी, चिंचवड - कर्जमुक्‍तीसाठी संघर्ष यात्रा काढणाऱ्या विरोधी पक्षांच्या नेत्यांनी सत्तेत असताना शेतकऱ्यांचा कधीच विचार केला नाही. पंतप्रधानांकडून शेतकऱ्यांना दिलेल्या पॅकेजचे पैसे वाटून खाल्ले, यांच्यासारखे कोडगे नेते संघर्ष यात्रा कशी काढू शकतात, याबद्दल आश्‍चर्य वाटत असल्याची खरमरीत टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी केली. संघर्ष यात्रेला संवाद यात्रेच्या माध्यमातून उत्तर देणार असल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले. 

पंडित दीनदयाळ उपाध्याय नगरी, चिंचवड - कर्जमुक्‍तीसाठी संघर्ष यात्रा काढणाऱ्या विरोधी पक्षांच्या नेत्यांनी सत्तेत असताना शेतकऱ्यांचा कधीच विचार केला नाही. पंतप्रधानांकडून शेतकऱ्यांना दिलेल्या पॅकेजचे पैसे वाटून खाल्ले, यांच्यासारखे कोडगे नेते संघर्ष यात्रा कशी काढू शकतात, याबद्दल आश्‍चर्य वाटत असल्याची खरमरीत टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी केली. संघर्ष यात्रेला संवाद यात्रेच्या माध्यमातून उत्तर देणार असल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले. 

भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीचा समारोप फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला. या कार्यक्रमाला राष्ट्रीय उपाध्यक्ष श्‍याम जाजू, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. 

आतापर्यंत सत्तेमध्ये राहिलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कायम व्हीआयपी कल्चरमध्येच काम केले. अठरा वर्षानंतर त्यांना जमिनीवर यावे लागले असून समाजात मिसळण्याची उपरती झाली आहे.

विरोधकांनी शेतकऱ्यांसाठी काढलेल्या संघर्ष यात्रेला कुठेच प्रतिसाद मिळताना दिसत नाही. पूर्वी सत्तेत असणाऱ्या नेत्यांनी आपल्याला फसविल्याची भावना प्रत्येक शेतकऱ्यामध्ये आहे. प्रत्येक क्षेत्रात त्यांनी भ्रष्टाचार केला. अगदी शेतकऱ्यांसाठी दिलेल्या पॅकेजमधले पैसेही खाल्ले.

जुन्या सरकारने राबविलेल्या धोरणांमुळे राज्यातील शेतकऱ्यांवर ही परिस्थिती ओढवली आहे. आधीच्या सरकारने जात, पैसा, भ्रष्टाचार यांच्या आधारावर कारभार केला. मात्र, आपल्याला क्षमता, विश्‍वासार्हता या जोरावरच सरकार चालवायचे असल्याचे फडणवीस या वेळी म्हणाले.  

ते म्हणाले, ‘‘राज्य सरकारतर्फे शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजना आमदार, खासदार, कार्यकर्त्यांनी शिवारावर जाऊन शेतकऱ्यांना सांगायच्या आहेत. पाच लाख कार्यकर्त्यांच्या माध्यमातून राज्यातील २५ लाख शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचे नियोजन करण्यात आले आहे.’’ निवडणुकांचे विश्‍लेषण करताना ते म्हणाले, ‘‘लोकसभा, विधानसभेची निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेमुळे जिंकलो, त्यावेळेस त्सुनामीच आली होती. आता भाजपला मिळालेला विजय हा विकास आणि विश्‍वासाच्या जोरावर मिळाला आहे. पक्षाला काही ठिकाणी शून्यातून तर काही ठिकाणी सत्तेतूनच पुन्हा सत्ता मिळाली आहे. नागपूरमध्ये पक्षाने चांगले काम केल्यामुळे तिथे सत्तेतून सत्ता मिळाली तर लातूरमध्ये पक्षाला शून्यातून सत्ता मिळाली.’’ सध्या भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात क्रमांक एकचा पक्ष असून उर्वरित सर्व पक्ष सेक्‍टोरियल झाले असल्याचे त्यांनी नमूद केले. 

रामराज्यापेक्षा भरताचे राज्य श्रेष्ठ होते. जनता राम असून, आपण भरताच्या भूमिकेतील विश्‍वस्त म्हणून काम करायचे आहे. विश्‍वस्ताच्या भूमिकेत आपण काम करत राहिलो तर आपल्याला विजयापासून कोणीच रोखू शकणार नसल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. राजा जर अहंकारी झाला तर त्याला जमिनीवर आणण्याचे काम जनता करते. आपल्याला मिळालेल्या विजयामुळे जबाबदारी आणि नम्रतेची भावना निर्माण झाली आहे. सत्तेचा उपयोग समाज परिवर्तनासाठी करायला हवा. हातात असणाऱ्या सत्तेचा वापर समाज परिवर्तनासाठी करायचा असून हातात असणाऱ्या सत्तेच्या माध्यमातून नवा इतिहास लिहिण्याची संधी मिळाली आहे. भाजपची सुरू असणारी विजयाची घोडदौड थांबणारी नसल्याचे सांगताना समाजात काम करत असताना अहंकारी होऊ नका, असा सल्ला त्यांनी या वेळी दिला.

दिग्गजांचे बुरूज ढासळले
पिंपरी-चिंचवड म्हटले की पवारांचा बालेकिल्ला, सोलापूर म्हटले की विजयसिंह मोहिते पाटील, कराडमध्ये पृथ्वीराज चव्हाण, सांगलीमध्ये पतंगराव कदम, इस्लामपूरमध्ये जयंत पाटील, कोल्हापूरमध्ये काँग्रेस अशी पूर्वी समीकरणे होती. आपण जनतेचे मालक असल्याचा त्यांचा आविर्भाव होता. मात्र, जनतेने त्यांना नाकारल्यामुळे या सर्वांचे बुरूज उद्‌ध्वस्त झाल्याचा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी लगावला.

Web Title: sangharsh yatra reply in Dialogue