सांगवीतील वेताळ महाराज उद्यानात असुविधा

रमेश मोरे
मंगळवार, 15 मे 2018

रंग उडालेली खेळणी, रात्री व दिवसा मद्यपींचा त्रास, अस्वच्छता, पालापाचोळा व कचरा उचलण्याऐवेजी तेथेच जाळला जातो, या सर्व गोष्टींचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. दिवसा व रात्री येथील झाडांखाली मद्यपींचा वावर वाढला आहे, त्यांना आवर घालावा अशी मागणी नागरिकांमधुन होत आहे.

जुनी सांगवी - पवना नदी काठी असलेल्या महापालिकेच्या वेताळ महाराज उद्यानात असुविधा व अस्वच्छतेने दुरावस्था झाली आहे. नदीकाठी सर्वात जुने असलेल्या या उद्यानाकडे महापालिकेच्या उद्यान विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. उद्यानाचे मागील गेट तुटलेले आहे. अनेक दिवसांपासुन हे उघडे राहात असल्याने भटकी कुत्री, जनावरे, मद्यपी येथे सहज प्रवेश करतात. अनेक दिवसांपासुन स्वच्छतागृहाचा दरवाजा तुटलेल्या अवस्थेत आहे. पाणी नसल्याने स्वच्छतागृह बंद आहे. उद्यानात बसण्यासाठी सध्या एकच लोखंडी बाक असुन त्याचीही दुरावस्था झालेली आहे. 

रंग उडालेली खेळणी, रात्री व दिवसा मद्यपींचा त्रास, अस्वच्छता, पालापाचोळा व कचरा उचलण्याऐवेजी तेथेच जाळला जातो, या सर्व गोष्टींचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. दिवसा व रात्री येथील झाडांखाली मद्यपींचा वावर वाढला आहे, त्यांना आवर घालावा अशी मागणी नागरिकांमधुन होत आहे.

या उद्यानाची देखभाल उषा भालचिम नावाची महिला तिच्या कुटुंबासह करते. मद्यपींना प्रतिबंध करायला गेल्यास होणारी दमदाटी, हाणामारी असे प्रसंग घडत असल्याचे तिने सकाळशी बोलताना सांगीतले. तसेच, उद्यानात पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने बागेत येणा-या अबाल वृद्धांची गैरसोय होते.

सांगवीत मोठी दोन उद्याने असल्याने वेताळ महाराज उद्यानाकडे पालिकेचे लक्ष नाही. येथे मद्यपींचा वावर वाढला आहे. त्याला प्रतिबंध करणे गरजेचे आहे, असे यावेळी पंकज कांबळेयांनी सांगितले. तसेच, पवना नदीकाठची अस्वच्छता व पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे उद्यानाची दुरावस्था झाली आहे असे संजय गायकवाड यांनी सांगितले. त्याचबरोबर सबंधित विभागांना येथे सुविधा करण्याबाबत कळवले आहे. लवकरच येथील समस्या मार्गी लागतील असे प्रतिपादन नगरसेवक हर्षल ढोरे यांनी केले आहे.

Web Title: in sangvis vatal maharaj park are discomfort