सॅनिटरी नॅपकिन वापराची ‘प्रेरणा’

जामगाव (ता. मुळशी) - आदिवासी मुली आणि महिलांना सॅनिटरी नॅपकिनचे वाटप करताना शारदा दातीर (उजवीकडून दुसऱ्या).
जामगाव (ता. मुळशी) - आदिवासी मुली आणि महिलांना सॅनिटरी नॅपकिनचे वाटप करताना शारदा दातीर (उजवीकडून दुसऱ्या).

माले - आजही शिक्षणाचा अजिबात गंध नसलेल्या आदिवासी कातकरी समाजातील मुली आणि महिलांना त्यांच्या आरोग्यासाठी सॅनिटरी नॅपकिन वापरण्यास प्रवृत्त करणारा ‘प्रेरणा’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्या अंतर्गत मुळशी तालुक्‍यातील कातकरी वस्तीवर जाऊन सॅनिटरी नॅपकिन वापराबाबतचे महत्त्व पटवून दिले जात आहे. मोफत नॅपकिनही पुरविले जात आहेत. 

माले (ता. मुळशी) येथील पोलिस पाटील शारदा विनोद दातीर या गेल्या तीन वर्षांपासून मुळशी तालुक्‍याच्या दुर्गम भागातील आदिवासींकरीता काम करत आहेत. पुण्यातील गुरुकुल शिक्षण संस्थेच्या बीबीएनएस स्कूलमार्फत ‘आनंद कुटी’ उपक्रमांतर्गत कातकरी कुटुंबांना धान्य आणि इतर गरजेच्या वस्तूंची मदत त्या करतात. त्याचदरम्यान या आदिवासींच्या विविध समस्यांची त्यांना माहिती झाली. विशेषतः वैयक्तिक स्वच्छता पाळण्याकडे आदिवासींचे कमालीचे दुर्लक्ष होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यात आदिवासी महिला आणि मुलींमध्ये मासिक पाळीबाबत अनेक गैरसमज आणि अंधश्रद्धा असल्याचे त्यांना दिसले. ‘पॅड मॅन’ चित्रपटातून ‘प्रेरणा’ घेऊन त्यांनी याबाबत काम करण्याचे निश्‍चित केले.

दातीर यांनी ‘बीबीएनएस’ स्कूलमार्फत महिला दिनी ‘एक हात आरोग्यासाठी’ हा उपक्रम सुरू केला. त्यात प्रत्येकाला आदिवासी महिला व मुलींकरिता एक सॅनिटरी नॅपकिन भेट देण्याचे आवाहन केले. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. मात्र, त्याचा वापर करण्याविषयी आदिवासींमध्ये जनजागृती करणे आवश्‍यक होते. या विषयावर त्यांच्याशी बोलण्यापूर्वी त्यांचा विश्‍वास संपादन करणे आवश्‍यक होते. कारण आदिवासींचा स्वभाव थोडा बुजरा असतो. त्यात शिक्षणाचा अभाव आणि अंधश्रद्धांचा त्यांच्यावर मोठा पगडा आहे. त्यासाठी माले, दिसली, जामगाव, कळमशेत, आंदेशे, बेलावडे येथील आदिवासी कातकरी वस्त्यांवरील महिला-मुलींना जामगाव-दिसली येथील सभागृहात मार्गदर्शन करण्यात आले. शारदा दातीर व पौड येथील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. वैदेही नगरकर यांनी गप्पांतून मनमोकळेपणाने संवाद साधला. त्यातून त्यांना मासिक पाळीबाबत माहिती दिली. तसेच सॅनिटरी नॅपकिन कसे आणि का वापरले पाहिजे, हे पटवून दिले. ‘आशा’ स्वयंसेविका मीना वाघ, बचत गटाच्या कार्यकर्त्या सुवर्णा कानगुडे, मालेच्या सरपंच सोनल शेंडे, नंदा दातीर, कोमल कांबळे, सचिन आकरे यांनीही मार्गदर्शन केले.

सुरवातीला सॅनिटरी नॅपकिन वाटपाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासही नकार देणाऱ्या मुलींनी कार्यक्रमाच्या शेवटी न लाजता मोकळेपणाने संवाद साधला. सर्वांसोबत फोटोही काढून घेतले. तसेच सॅनिटरी नॅपकिन वापराचा निश्‍चय केला. 
 - शारदा दातीर, पोलिस पाटील, माले 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com