‘सॅनिटरी पॅड’ निर्मितीतून रोजगार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 डिसेंबर 2018

पुणे - ‘महिलांसाठी ‘सॅनिटरी पॅड’ हा शब्द तसा परिचितच, पण वास्तवात आजही देशातील सुमारे ६२ टक्के महिला कोणतेही सॅनिटरी पॅड वापरत नाहीत,’ सांगत होता सचिन सुभाष. ‘सॅनिटरी पॅड’बद्दल पुरेशी माहिती नसल्यामुळे स्वतःच्या आईलाच गर्भाशय काढावे लागल्यामुळे व्याकुळ झालेल्या सचिनने ‘महिलांचे आरोग्य’ या विषयावर काम करायला सुरवात केली. त्याच्या ‘आशा पॅड’च्या निर्मितीचे मॉडेल लवकरच तो गडचिरोली जिल्ह्यात राबविणार आहे.  

सिंहगड विधी महाविद्यालयात दुसऱ्या वर्षात सचिन शिक्षण घेत आहे. आईच्या आजारामुळे व्यथित झालेल्या सचिनने दोन वर्षांपूर्वी महिलांच्या आरोग्यविषयक क्षेत्रात काम करण्याचे ठरविले. त्याच्या असे लक्षात आले की, आदिवासी व ग्रामीण महिलांना बाजारात उपलब्ध असलेले पॅड विकत घेणे परवडत नाही. यावर उपाय म्हणून सचिनने ‘सॅनिटरी पॅड’ची विक्री करण्यापेक्षा त्याच्या निर्मितीचे तंत्र विकसित करून ग्रामीण भागातील महिलांना रोजगाराची एक संधीही उपलब्ध करून दिली. त्याद्वारे सध्या ६ महिलांना रोजगार मिळाला असून, ग्रामीण भागातील आठशेहून अधिक महिलांना त्याने प्रशिक्षण दिले आहे. सचिनने निर्माण केलेले ‘मॉडेल’ची अंमलबजावणी आंबेगाव तालुक्‍यातील चिखली गावात व गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्‍यात पुढच्या महिन्यापासून सुरू करण्यासाठी त्याचे सध्या प्रयत्न सुरू आहेत.

स्नेहालयाकडून कार्याची दखल 
सचिनच्या या कार्याची दखल घेत शहरातील ‘स्नेहालय’ या सेवाभावी संस्थेतर्फे त्याला व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या मयूर पवार, प्रदीप देवकुळे, आदित्य हबिले आणि मृण्मयी परळीकर यांना गौरविण्यात येणार आहे. हा कार्यक्रम १८ डिसेंबरला सायंकाळी ५ वाजता सिम्बायोसिस महाविद्यालयात होईल, अशी माहिती संस्थेच्या संचालिका शुभांगी कोपरकर यांनी दिली.

प्रत्येक गावात बचत गटांच्या धर्तीवर स्वयंसहायता समूहाचे निर्माण करून सॅनिटरी पॅड निर्मिती करण्याचा प्रयत्न आहे. तसेच, राज्यातील प्रत्येक गावात असे ‘मॉडेल’ तयार करणे शक्‍य आहे. त्यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहे. 
- सचिन सुभाष

Web Title: Sanitary pad Making Employment Sachin Subhash