'शासनाने फसविल्याने काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेस जनतेचा प्रतिसाद'

श्रीकृष्ण नेवसे
मंगळवार, 4 सप्टेंबर 2018

केंद्र व राज्य शासनाच्या फसव्या घोषणा व फसव्याच कारभाराबाबत जनजागृती करण्यासाठी व पुन्हा जनताभिमुख काँग्रेसची सत्ता आणण्यासाठी महाराष्ट्र राज्यात प्रदेश काँग्रेसच्या वतीने जनसंघर्ष यात्रेचे आयोजन केले आहे. त्यास जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती पुणे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष संजय जगताप यांनी आज दिली. तसेच ही जनसंघर्ष यात्रा उद्या 5 सप्टेंबर रोजी सोलापूर जिल्ह्यातून पुणे जिल्ह्यात प्रवेश करीत आहे. येथेही त्यास प्रतिसाद मिळेल, असेही त्यांनी सांगितले.

सासवड- केंद्र व राज्य शासनाच्या फसव्या घोषणा व फसव्याच कारभाराबाबत जनजागृती करण्यासाठी व पुन्हा जनताभिमुख काँग्रेसची सत्ता आणण्यासाठी महाराष्ट्र राज्यात प्रदेश काँग्रेसच्या वतीने जनसंघर्ष यात्रेचे आयोजन केले आहे. त्यास जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती पुणे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष संजय जगताप यांनी आज दिली. तसेच ही जनसंघर्ष यात्रा उद्या 5 सप्टेंबर रोजी सोलापूर जिल्ह्यातून पुणे जिल्ह्यात प्रवेश करीत आहे. येथेही त्यास प्रतिसाद मिळेल, असेही त्यांनी सांगितले.

जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष संजय जगताप म्हणाले की, 5 सप्टेंबरला सकाळी 10 वाजता इंदापूर येथे जनसंघर्ष यात्रेचे आगमन होईल. याठिकाणी जिल्ह्यातील काँग्रेसचे सर्व प्रमुख कार्यकर्ते स्वागत करतील. त्यानंतर मोटारसायकल रॅली होऊन मार्केट कमिटीच्या आवारात जाहीर सभा होणार आहे. नंतर निमगाव केतकी, अंथुर्णे, जंक्शन, लासुर्णे, सणसर, भवानीनगरमार्गे बारामतीमध्ये यात्रा प्रवेश करेल. शहरातून रॅलीने मोरगावमार्गे पुरंदर तालुक्यात प्रवेश होऊन जेजुरीत ही यात्रा मोटार सायकल रॅलीव्दारे येईल. तेथून मुख्य रस्त्याने जाऊन पुढे सासवड शहरात ही रॅली येईल. येथे छत्रपती शिवाजी महाराज व इतर पुतळ्यांचे पुजन करुन ही रॅली शहरातील अंतर्गत रस्त्याने कापूरव्होळ (ता. भोर) ला जाईल. त्यानंतर, नसरापूर येथे सायंकाळी जाहीरसभा होणार असून रात्री यात्रा पुण्याकडे मार्गस्थ होईल.

या जनसंघर्ष यात्रेत माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, बाळासाहेब थोरात, नसीमखान, हर्षवर्धन पाटील, सतेज पाटील, मधुकर चव्हाण, आमदार विश्वजित कदम, संग्राम थोपटे, प्रदेश महिलाध्यक्षा चारुलता टोकस, शरद रणपिसे, बसवराज पाटील, रामहरी रुपनवर, डी. पी. सावंत, आनंदराव पाटील आदींसह काँग्रेस व युवक काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, आमदार, खासदार सहभागी होणार असून नागरिकांनीही यात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष संजय जगताप व सरचिटणीस नंदकुमार जगताप यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sanjay jagtap speak about jansangharsh Yatra