‘संस्कार’च्या 42 मालमत्ता संरक्षित

रवींद्र जगधने
शनिवार, 19 मे 2018

पिंपरी - संस्कार ग्रुपच्या दामदुप्पट व्याजाच्या आमिषाला बळी पडून झालेल्या फसवणुकीत आठ हजारांपेक्षा जास्त गुंतवणूकदारांची नोंद पोलिसांकडे झाली आहे. तर फसवणुकीची एकूण रक्कम १७ कोटींवर पोचली असून, संस्कार ग्रुपच्या ४२ मालमत्ता संरक्षित केल्याची माहिती पोलिसांनी ‘सकाळ’ला दिली. 

पिंपरी - संस्कार ग्रुपच्या दामदुप्पट व्याजाच्या आमिषाला बळी पडून झालेल्या फसवणुकीत आठ हजारांपेक्षा जास्त गुंतवणूकदारांची नोंद पोलिसांकडे झाली आहे. तर फसवणुकीची एकूण रक्कम १७ कोटींवर पोचली असून, संस्कार ग्रुपच्या ४२ मालमत्ता संरक्षित केल्याची माहिती पोलिसांनी ‘सकाळ’ला दिली. 

गुंतवणूकदारांनी संस्कार ग्रुपच्या विविध योजनांत गुंतवणूक केलेल्या रकमेतून संस्कार ग्रुपने मालमत्ता खरेदी केली. खरेदी केलेली मालमत्ता, पतसंस्था बॅंकांकडे तारण ठेवून मोठे कर्ज घेतल्याची माहिती पुढे आली आहे. पोलिसांनी या मालमत्ता संरक्षित करून त्याची कोणत्याही प्रकारची खरेदी-विक्री होणार याबाबत हालचाली सुरू केल्या आहेत. पोलिसांकडे संस्कार ग्रुपविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर कार्यालयातील कागदपत्रे, सात हार्डडिक्‍स जप्त केल्या होत्या. सध्या हार्डडिक्‍स फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीस असून, अनेक महत्त्वाची कागदपत्रे, गुंतवणूकदारांची माहिती व सर्व्हर गायब असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांची एकूण संख्या व एकूण रकमेची माहिती मिळवणे पोलिसांपुढे मोठे आव्हान आहे. 

दिघी पोलिसांकडून संस्कारचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग झाल्यानंतर विशेष पथकाने या तपासाला गती दिली आहे. त्यामुळे फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी पोलिसांकडे तक्रार दाखल करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. 

ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठी
गुंतवणूकदारांमध्ये माजी सैनिक, पोलिस, शिक्षक तसेच सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांचा मोठा भरणा आहे. जादा व्याज मिळते म्हणून सेवानिवृत्तीनंतर मिळालेली रक्कम गुंतविणाऱ्यांची संख्याही काही हजार आहे. त्यांना आता व्याज मिळत नसल्याचे त्यांची गैरसोय झाली आहे. काही ज्येष्ठ नागरिकांना दैनंदिन औषधासाठीही पैसे नाहीत.

दीड वर्षांपासून आरोपी फरार
संस्कार ग्रुपच्या प्रकरणात एक महिला पदाधिकारी तुरुंगात आहे. संस्थेचे प्रमुख्य वैकुंठ कुंभार, त्यांची पत्नी राणी कुंभार दीड वर्षापासून फरार आहेत. त्यांच्याशिवाय तीन संचालक जामिनावर बाहेर आहेत.  

संस्कार ग्रुपचा तपास सुरू असून, यातील मुख्य सूत्रधारांचा शोध सुरू आहे. फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी पुणे येथील आर्थिक गुन्हे शाखेकडे संपर्क साधल्यास पोलिसांना त्यांच्या रकमेची नोंद करता येईल.
- सुनील कलगुटकर, पोलिस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा

Web Title: sanskar group 42 property secure