ज्ञानदेवा माझे आई, सांभाळी गे माई 

विलास काटे 
Saturday, 13 June 2020

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे मोजक्‍या वारकऱ्यांच्या उपस्थितीत प्रस्थान 

आळंदी : टाळ-मृदंगाचा गजर....अन्‌ माऊली-माऊलीच्या जयघोषात मोजक्‍याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत माऊलींच्या पादुका वीणा मंडपातून बाहेर आणण्यात आल्या. वैष्णवांनी केलेल्या "पुंडलिका वरदे हरी विठ्ठल'च्या जयघोषात सायंकाळी पाचच्या सुमारास संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांनी पंढरीच्या दिशेने प्रस्थान ठेवले. संख्या कमी असली तरी उपस्थित वारकऱ्यांनी केलेल्या गजराने अवघी अलंकापुरी दुमदुमून गेली. 
यंदा कोरोनाच्या संसर्गामुळे सरकारने पायी वारी रद्द केली. मात्र, परंपरा अबादित राखण्यासाठी मोजक्‍या पन्नास लोकांना प्रस्थान सोहळ्यासाठी परवानगी देण्यात आली होती. 

बहू जन्माची पुण्याई 
शरण आलो तुझे पायी 
ज्ञानदेवा माझे आई 
सांभाळी गे माई 

ही भावना हदयात बाळगून माउलींच्या सहवासाची आणि विठुरायाच्या चरणी वारी रूजू करण्याची आस लाखो वारकऱ्यांना होती. कोरोना साथीमुळे यंदा पायी वारी घडणार नाही. ही रूखरूख वारकऱ्यांच्या मनात होती. मात्र, "कोरोनापासून मुक्ती दे, जगण्याचे बळ दे', अशीच भावना प्रत्येक वारकऱ्यांच्या मनात आहे. आळंदीत ठिकठिकाणी मंदिराकडे येणाऱ्या रस्त्यांवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सकाळपासून वातावरण ढगाळ होते. दुपारी बाराच्या सुमारास पावसाने शिडकावा केला. 

पुण्यातल्या लॉकडाउनचं काय होणार? वाचा व्हायरल मेसेजमागचं सत्य 

दरम्यान, पहाटे घंटानाद, काकडा, पवमान अभिषेक या नैमित्यिक कार्यक्रमानंतर दुपारी साडेबारा वाजता माऊलींना नैवद्य देण्यात आला. देऊळवाडा आकर्षक फुलांनी सजविला होता. समाधी दर्शन पूर्णतः बंद होते. दुपारनंतर देऊळवाडा स्वच्छ करून प्रस्थान सोहळ्यास सुरुवात झाली. ब्रम्हवृदांनी माऊलींच्या समाधीवर चांदीचा मुखवटा ठेवला. गळ्यात तुळशीचा आणि फुलांचा हार घातला. त्यामुळे माऊलींचे लोभस रूप डोळ्यात साठवीत भाविकांनी हरिनामाचा गजर केला.

आणखी वाचा - संभाजीराजे पुण्याच्या तरुणाला म्हणाले छत्रपतींचा मावळा

ब्रम्हवृंदांचा मंत्रघोषाला सुरुवात झाली. पावणे तीन वाजता रथापुढील मानाच्या 27 आणि रथामागील 20 दिंड्यातील पुणे भागातील निमंत्रित प्रतिनिधींना सोडण्यास सुरुवात झाली. चोपदारांच्या मदतीने पोलिस वारकऱ्यांना प्रवेश देत होते. मंदिरात येणाऱ्या वारकऱ्यांची थर्मल टेस्ट करून सोडण्यात आले. टाळ-मृदंग, पताका संस्थानतर्फे सॅनिटाइज करण्यात आले. दिंडीतील वारकऱ्यांच्या मुखातून माऊलीनामाचा जयघोष सुरू होता. दरम्यान, मुख्य गाभाऱ्यात गुरू हैबतबाबा यांच्या वतीने मालक बाळासाहेब आरफळकर यांनी आरती झाली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

त्यानंतर देवस्थानच्या वतीने आरती झाली. देवस्थानच्या वतीने मानकऱ्यांना नारळ प्रसाद देण्यात आला. प्रमुख विश्‍वस्त ऍड. विकास ढगे, सोहळा प्रमुख योगेश देसाई, डॉ. अभय टिळक यांची उपस्थिती होती. आरफळकर आणि देवस्थानच्या वतीने दिंडीप्रमुख आणि मानकऱ्यांना नारळ प्रसाद देण्यात आला. त्यानंतर संस्थानच्या वतीने दिंडीकरी, फडकरी यांना मानाचे पागोटे देण्यात आले. बाळासाहेब आरफळकर, बाळासाहेब चोपदार, राजाभाऊ चोपदार, रामभाऊ आरफळकर आदी उपस्थित होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दरम्यान, सोहळा प्रमुख देसाई यांनी पालखी सोहळा मालक आरफळकर यांच्या हातात माऊलींच्या पादुका दिल्या आणि माऊली माऊलींचा जयघोष झाला. आरफळकर पादुका हातात घेवून वीणा मंडपातून मंदिर प्रदक्षिणासाठी बाहेर पडले आणि "पुंडलिकवरदा हरी विठ्ठल हरी विठ्ठल'च्या घोषाने देऊळवाडा दणाणून गेला. त्यानंतर सतरा दिवसांच्या मुक्कामासाठी पादुका आजोळघरी मुक्कामी विसावल्या. 

आळंदी ओस 
दरम्यान, आळंदीत मंदिराजवळच दोन दिवसांपूर्वी कोरोना झालेल्या महिलेचा मृत्यू झाला होता. त्यामुळे तो परिसर प्रतिबंधित करण्यात आला होता. मंदिराकडे जाणारे सर्व रस्ते बंद होते. सोहळ्यास परवानगी दिलेल्यांनाच प्रवेश देण्यात येत होता. दरवर्षी आळंदी वारकऱ्यांच्या गर्दीने फुलून जाते. मात्र, यंदा चित्र वेगळे होते. सरकारच्या निर्बंधामुळे वारी रद्द झाल्याने आळंदीत गर्दी नव्हती. इंद्रायणी नदीचा घाट ओस पडला होता. देऊळवाड्यात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. देऊळवाड्यात गर्दी फुलांची सजावट असते.  

Wari 2020 वारी 2020


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sant dnyaneshwar maharaj palkhi sohala start