सजविलेल्या बसमधून संतांच्या पादुका मार्गस्थ

विलास काटे,  मुकुंद परंडवाल
बुधवार, 1 जुलै 2020

ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पादुका आळंदीहून,तर संत तुकाराम महाराजांच्या पादुका देहूतून मंगळवारी पोलिस बंदोबस्तात फुलांनी सजविलेल्या बसमधून 20वारकऱ्यांसमवेत विठुरायाच्या भेटीसाठी पंढरीकडे मार्गस्थ झाल्या

पुणे - कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने यंदा पायी आषाढी वारी रद्द केली. संतांच्या पादुका एसटी बसने थेट पंढरपूरला नेण्याचा निर्णय झाला. त्यानुसार संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पादुका आळंदीहून, तर संत तुकाराम महाराजांच्या पादुका देहूतून मंगळवारी पोलिस बंदोबस्तात फुलांनी सजविलेल्या बसमधून प्रत्येकी फक्त वीस वारकऱ्यांसमवेत विठुरायाच्या भेटीसाठी पंढरीकडे मार्गस्थ झाल्या.

आळंदी - फुलांनी सजविलेली लालपरी... माउलीनामाचा गजर अन्‌ ‘पुंडलिका वरदे हरी विठ्ठल’चा जयघोष करीत १७ दिवसांचा आजोळघराचा मुक्काम उरकून माउलींच्या पादुका पंढरीकडे निघाल्या. आळंदीकरांनी जड अंतःकरणाने निरोप दिला.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आजोळघरी पादुका दर्शनाला बंदी होती. पहाटे पादुकांवर पवमान पूजा, दुधारती झाली. दुपारी बाराच्या दरम्यान नैवेद्य दाखविण्यात आला. नगरपालिका चौकापासून आजोळघरापर्यंत रांगोळीच्या पायघड्या घातल्या होत्या. दुतर्फा घरांतून, गॅलरीतून आळंदीकर माउलींच्या दर्शनासाठी उभे होते. दुपारी एक वाजता कर्णा वाजल्यानंतर पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर हे माउलींच्या पादुका हातात घेऊन बसच्या दिशेने निघाले. नामघोषात पादुका बसमध्ये नेण्यात आल्या. पहिल्या सीटवर केलेल्या सिंहासनावर माउलींच्या पादुका विराजमान झाल्या. पालखी सोहळा प्रमुख योगेश देसाई, प्रमुख विश्वस्त ॲड. विकास ढगे, प्रांताधिकारी संजय तेली, बाळासाहेब चोपदार, नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर आदी उपस्थित होते. ‘पुंडलिका वरदे हरी विठ्ठल’चा गजर करीत माउलींच्या पादुका घेऊन बस मार्गस्थ झाली. या वेळी बसवर फुलांची उधळण करण्यात आली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

आजोळघरी सकाळी दहानंतर परिसरातील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. बसमध्ये जाणारे, दर्शन घेणारे तसेच बाहेर रस्त्यावर मोठ्या संख्येने भाविक गर्दी करून थांबले होते. त्या वेळी सोशल डिस्टन्सिंगचे पालन झाले नाही.

देहू - टाळमृदंगाच्या गजरात, ज्ञानोबा तुकाराम आणि पुंडलिका वरदे हरी विठ्ठल अशा नामघोषात आषाढी एकादशीसाठी संत तुकाराम महाराजांच्या पादुका देहूतून पंढरपूरकडे मंगळवारी (ता. ३०) मार्गस्थ झाल्या. फुलांनी सजविलेल्या एसटी बसमध्ये संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष, विश्‍वस्त आणि सेवेकरी अशा वीस जणांबरोबर पादुका ठेवण्यात आल्या. देहूकरांनी या सोहळ्याला भावपूर्ण निरोप दिला. 

मुख्य देऊळवाड्यात पहाटे काकडा झाला. संत तुकाराम शिळा मंदिरात विश्‍वस्तांनी आरती केली. संस्थानचे अध्यक्ष मधुकर महाराज मोरे यांच्या हस्ते भजनी मंडपात पादुकांची पूजा झाली. तसेच विठ्ठल रुक्‍मिणी मंदिरातही त्यांनी सपत्निक महापूजा व आरती केली. त्यानंतर कीर्तन झाले. देऊळवाड्याला पुण्यातील ताम्हाणे कुटुंबीयांनी फुलांची आकर्षक सजावट केली होती. दुपारी बारा वाजता भजनी मंडपात पंचपदी झाली. त्यानंतर मंदिर प्रदक्षिणा झाली. त्यानंतर पादुका डोक्‍यावर घेऊन इनामदारवाड्याजवळ एसटी बसमध्ये पादुका ठेवण्यात आल्या.

या वेळी अध्यक्ष मधुकर महाराज मोरे, पालखी सोहळा प्रमुख विशाल महाराज मोरे, माणिक महाराज मोरे, संतोष महाराज मोरे, विश्‍वस्त संजय महाराज मोरे, अजित महाराज मोरे, अधिकारी उपस्थित होते. ग्रामस्थांनी व भाविकांनी बसवर फुलांचा वर्षाव केला. वाटेत अनगडशावली दर्ग्यात आरती झाली. माळवाडी येथील परंडवाल कुटुंबीयांनी पादुकांचे स्वागत केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sant dnyaneshwar maharaj & Sant Tukaram Maharaj Paduka