बीज सोहळ्यासाठी भाविकांची गर्दी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मार्च 2019

देहू - शुक्रवारी (ता. २२) होणाऱ्या जगद्‌गुरू संत श्री तुकाराम महाराज बीज सोहळ्यासाठी राज्याच्या विविध कानाकोपऱ्यातून हजारो भाविक आणि दिंड्या देहूत दाखल झाले. त्यामुळे देहूनगरी विठुनामाच्या गजरात दंग झाली आहे. गावात ठिकठिकाणी गाथा पारायण सोहळा आणि अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी संत तुकाराम महाराज देऊळवाडा आणि वैकुंठस्थान मंदिरात पोलिसांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. त्यामुळे देहूला छावणीचे स्वरूप आले आहे. 

यंदा ३७१ व्या बीज उत्सव सोहळ्याच्या पार्श्‍वभूमीवर मुख्य देऊळवाड्यात आणि वैकुंठस्थान मंदिरात गुरुवारी (ता. २१) पहाटेपासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. वडिवळे धरणातून इंद्रायणी नदीला पाणी सोडल्याने इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहत आहे. मुख्य देऊळवाड्यात दर्शनासाठी जाण्यापूर्वी इंद्रायणी नदीत स्नान केले. त्यानंतर भाविकांनी दर्शनबारीतून विठ्ठल- रुक्‍मिणी, संत तुकाराम महाराज शिळा मंदिरात दर्शन घेतले. बीज सोहळ्यासाठी पंढरपूर, आळंदी या भागातून आलेल्या विक्रेत्यांनी ठिकठिकाणी प्रसादाची दुकाने थाटली आहेत. मुख्य देऊळवाडा, वैकुंठस्थान, गावाचे प्रवेशद्वार परिसरात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

मुख्य सोहळा वैकुंठस्थान मंदिरात असल्याने या परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. चाकण, तळेगाव, देहूफाटा मार्गाने देहूत येणारी वाहतूक इंद्रायणी नदीवरून बंद करण्यात आली आहे. तसेच आळंदी मार्गे येणारी वाहतूक विठ्ठलवाडी येथे थांबविण्यात येणार असून देहूरोडकडून येणारी वाहतूक माळवाडीपर्यंत असेल. विठ्ठलवाडी, माळवाडी येथे बसथांब्यासाठी जागा उपलब्ध केली आहे, असे पोलिस निरीक्षक प्रकाश धस यांनी सांगितले. 

इंद्रायणी नदीत पाणी सोडण्यात आल्यामुळे पाण्याची पातळी वाढली आहे. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, म्हणून स्थानिक जीवरक्षकांचे पथक तैनात करण्यात आले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने चार ठिकाणी बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात आले आहेत.

आजचे कार्यक्रम - 
 पहाटे ३ - मुख्य देऊळवाड्यात काकडआरती.
 पहाटे ४ - श्री पूजा, शिळा मंदिरात संस्थानचे विश्‍वस्त, अध्यक्ष मंडळ, 
   वंशज, वारकरी यांच्या हस्ते महापूजा. 
 पहाटे ६ - वैकुंठ स्थान येथील संत तुकाराम महाराज मंदिरात महापूजा.
 सकाळी १०.३० - वैकुंठस्थान मंदिराकडे पालखी प्रस्थान.
 सकाळी १० ते दुपारी १२ - वैकुंठस्थान मंदिरासमोर देहूकर महाराजांचे 
   वैकुंठ सोहळा कीर्तन.
 दुपारी १२.३० - वैकुंठस्थान येथून पालखीचे मुख्य देऊळवाड्यातील        मंदिराकडे आगमन.
 त्यानंतर रात्री पारंपरिक फड आणि दिंड्या यांचे कीर्तन कार्यक्रम.

Web Title: Sant Tukaram Beej Sohala Bhavik