तुकोबांची पालखी देहूत

तुकोबांची पालखी देहूत

देहू - तुकोबा तुकोबा नामाचा जयघोष आणि टाळ मृदंगाच्या निनादात तब्बल ३४ दिवसांच्या प्रवासानंतर संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे रविवारी (ता. २८) दुपारी दोन वाजता देहूत आगमन झाले. पालखीचे आगमन होताच पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी दर्शनासाठी गर्दी केली.

आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे २४ जूनला देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान झाले होते. पंढरपुरात आषाढी एकादशीला लाखो भाविकांच्या समवेत वारी समर्पित करून संत तुकाराम महाराज पालखी सोहळा परतीचा मार्ग धरत पिंपरी-चिंचवड शहरात शनिवारी (ता. २७) मुक्कामी होता. रविवारी सकाळी सात वाजता पालखी सोहळा निगडीकडे मार्गस्थ झाला. पालखी सोहळ्याचे निगडीतील भक्ती-शक्ती उद्यानाजवळ महापालिका आणि निगडी ग्रामस्थांच्या वतीने स्वागत झाले. त्यानंतर निगडी ते देहूरोड मार्गे चिंचोली येथील शनी मंदिरात दुपारी साडेबारा वाजता पालखीचे आगमन झाले. या ठिकाणी संस्थानच्या वतीने अभंग आरती झाली. अण्णा भेगडे, गिरीश दाभाडे, रमेश जाधव, गोविंद भेगडे, दत्तात्रेय लांडगे उपस्थित होते. देहू पंचक्रोशीतील नागरिक पालखीच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर पालखी देहूतील अनगडशावली बाबा मंदिराजवळ आली. या ठिकाणी अभंग आरती झाली. त्यानंतर टाळ मृदंगाच्या गजरात पालखीचे गावाच्या प्रवेशद्वाराजवळ आगमन झाले. गावातील तुपे कुटुंबाकडून परंपरेनुसार प्रवेशद्वाराजवळ दहीभाताचा नैवेद्य दाखवला. ग्रामपंचायत कार्यालयाजवळ ग्रामपंचायतीच्या वतीने पालखीचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर पालखी बाजारपेठ मार्गे देऊळवाड्याकडे मार्गस्थ झाली.

दुपारी तीननंतर पालखीचे देऊळवाड्यात आगमन झाले. मंदिर प्रदक्षिणा झाल्यानंतर भजनी मंडपात आरती झाली. या वेळी संस्थानचे अध्यक्ष मधुकर महाराज मोरे, पालखी सोहळा प्रमुख संजय महाराज मोरे, काशिनाथ मोरे, अजित मोरे, विश्वस्त विशाल मोरे, माणिक मोरे, संतोष मोरे, माजी विश्वस्त सुनील महाराज मोरे उपस्थित होते. पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या विणेकऱ्यांचा संस्थानच्या वतीने नारळ प्रसाद देऊन सत्कार करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com