वाहतूक कोंडीचा नाशिक महामार्ग

संतोष पोटे
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

पुणे-नाशिक महामार्ग हा गेली कित्येक वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेला महामार्ग आहे. कारण, काही वर्षापर्यंत या महामार्गाला मृत्यूचा सापळा म्हणूनही संबोधले जायचे. मात्र याच मार्गावर आता नवीन समस्या उभी राहिलेली आहे, ती म्हणजे वाहतूक कोंडीची. त्यामुळे वाहतूक कोंडीचा महामार्ग असे नवीन नाव त्याला देण्यात आले आहे.

पुणे-नाशिक महामार्ग हा गेली कित्येक वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेला महामार्ग आहे. कारण, काही वर्षापर्यंत या महामार्गाला मृत्यूचा सापळा म्हणूनही संबोधले जायचे. मात्र याच मार्गावर आता नवीन समस्या उभी राहिलेली आहे, ती म्हणजे वाहतूक कोंडीची. त्यामुळे वाहतूक कोंडीचा महामार्ग असे नवीन नाव त्याला देण्यात आले आहे.

नाशिक ते आळेफाटादरम्यान या महामार्गाचे काम जवळपास पूर्ण झालेले असले तरी आळेफाटा ते नाशिक फाटा हा जवळपास 85 किलोमीटर रस्त्याचे काम अपूर्ण आहे. कारण आळेफाटा, नारायणगाव, मंचर, राजगुरुनगर या शहरांच्या बाह्यवळण मार्गाचे काम रखडलेले आहे. या शहरातून कामानिमित्त पुण्याला जाणाऱ्या लोकांना वाहतूक कोंडीत तासनतास अडकून पडावे लागते. एक तासाच्या अंतराला आता पाच तासांचा अवधी लागत असल्याने प्रवाशांना मानसिक त्रासाबरोबरच वाया जाणाऱ्या इंधनाच्या आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागत आहे. चारपदरी मार्गावरील वाहणे एकाच वेळी एकेरी मार्गावर आल्याने वाहतूक कोंडी ठरलेली आहे, त्यात एखादे वाहन बंद पडले, तर पूर्ण रस्त्यावरील वाहतूक ठप्प होते. जोपर्यंत क्रेनने संबंधित वाहन बाजूला केले जात नाही, तोपर्यंत वाहतूक सुरळीत होत नाही. पुढे जाण्याच्या घाईत सर्व नियम धाब्यावर बसवून चारचाकी वाहनांमुळे रस्ता जाम होतो. त्यात भरीस भर म्हणून एसटी चालक कधीच कमीपणा घेत नाही, तेही पुढे जाण्याच्या स्पर्धेत भाग घेतात. सध्या होत असलेल्या पावसाने जुन्या मार्गाची चाळण झाली असून काही ठिकाणी तर अर्धा फुटापर्यंत खड्डे पडलेले आहेत. परिणामी वाहनांची गती मंदावून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. राजगुरुनगर चौकात शहरातून येणारी वाहने आणि महामार्गावरील वाहने यांचीही आधी जाण्याची स्पर्धा कायम असते. यातून कसेबसे पुढे गेल्यावर टोल नाक्‍याचा संथ कारभार वाहतूक कोंडीला पुन्हा एकदा सामोरे जाण्यास भाग पाडतो.

वाहतूक कोंडीची सर्वांत मोठी समस्या चाकण तळेगाव चौकात भेडसावते. तळेगाव-न्हावरे व पुणे-नाशिक महामार्ग जोडणारा हा चौक असून सर्वांत जास्त जड वाहतूक या मार्गाने होते. हलकी आणि जड अशी दोन्ही वाहने या मार्गावरून जात असल्याने त्यामानाने छोटा चौक असलेल्या या मार्गावरील वाहने एकत्र आल्यावर लहान चौक, निमुळता रस्ता आणि खड्डे त्यातच रस्त्यालगत उभी असलेली अनधिकृत वाहतुकीची वाहने यामुळे या दोन्ही मार्गावर वाहतूक नियंत्रण दिव्याजवळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असतात. बऱ्याचदा सिग्नलही बंद असतो, पुढे जाण्याच्या नादात अनेक वाहने मार्ग सोडून सेवा रस्त्यांनी पुढे जाण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे वाहतूक कोंडी ही नित्याची झाली आहे. या सर्व गदारोळात वाहतूक नियंत्रक पोलिस आपली महत्त्वाची भूमिका पार पाडत असताना शक्‍य तितका प्रयत्न करून वाहने पुढे काढत महामार्ग सुरळीत करण्याचा प्रयत्न करताना दिसतात. मात्र, महामार्ग जुनाच आहे त्या तुलनेत रस्त्यावरील वाहनांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली असून पोलिसांची संख्या कमी व वाहनांची संख्या जास्त त्यामुळे पोलिसांचे प्रयत्न असफल ठरतात.
एकंदरीत महामार्गाची अवस्था पाहता विद्यार्थी, कामावर जाणारे चाकरमानी, रुग्णवाहिका कोणीही वेळेवर पोचू शकत नाहीत. प्रथमोपचार म्हणून प्रशासनाने पहिले खड्डे बुजविले पाहिजे, वाहतूक नियंत्रणासाठी पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या वाढविणे गरजेचे असून प्रलंबित महामार्गाचे तसेच बाह्यवळण मार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची गरज आहे.

- संतोष पोटे, मंचर (पुणे-नाशिक महामार्गावर नियमित प्रवास करणारे प्रवासी)

Web Title: santosh pote write pune nashik highway traffic jam experience