संविधानच्या सन्मानासाठी 'मूक वादळ'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 नोव्हेंबर 2016

पुणे - 'ना जातीसाठी, ना मातीसाठी, आपला संघर्ष केवळ संविधानाच्या सन्मानासाठी' हा विचार समोर ठेवून एकवटलेले लाखो बांधव... त्यात महिलांचा लक्षणीय सहभाग... तरुणाईच्या हातून हवेत उंचावणारा निळा ध्वज... ध्वजावर बाबासाहेबांची प्रतिमा... प्रत्येकाच्या डोक्‍यावर निळ्या रंगाची टोपी अन्‌ निळ्या रंगाचेच उपरणे... अशा वातावरणात संविधान सन्मान मूक मोर्चा रविवारी निघाला. "एकच पर्व, बहुजन सर्व' असा संदेशही यातून देण्यात आला.

पुणे - 'ना जातीसाठी, ना मातीसाठी, आपला संघर्ष केवळ संविधानाच्या सन्मानासाठी' हा विचार समोर ठेवून एकवटलेले लाखो बांधव... त्यात महिलांचा लक्षणीय सहभाग... तरुणाईच्या हातून हवेत उंचावणारा निळा ध्वज... ध्वजावर बाबासाहेबांची प्रतिमा... प्रत्येकाच्या डोक्‍यावर निळ्या रंगाची टोपी अन्‌ निळ्या रंगाचेच उपरणे... अशा वातावरणात संविधान सन्मान मूक मोर्चा रविवारी निघाला. "एकच पर्व, बहुजन सर्व' असा संदेशही यातून देण्यात आला.

रविवारची सकाळ उजाडली तीच, "संविधान सन्मान मूक मोर्चा'च्या चर्चेने! खंडूजीबाबा चौकात उभारलेल्या व्यासपीठावरून दिल्या जाणाऱ्या सूचनांच्या दिशेने निळे, पिवळे ध्वज घेतलेले समूह डेक्कन परिसरात दाखल होत होते. शहर व परिसरातील महिला, वृद्ध, युवती येथे सकाळी नऊ वाजल्यापासूनच मोठ्या संख्येने दाखल होण्यास सुरवात झाली. "हा मोर्चा कुठल्याही जाती-धर्माविरुद्ध नाही', "राजकीय व्यक्तींनी मोर्चाच्या शेवटी थांबावे' अशा घोषणा सातत्याने दिल्या जात होत्या. गर्दीने उच्चांक गाठल्यानंतर दुपारी बाराच्या सुमारास सर्व धर्मातील युवतींनी छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर उपस्थितांनी भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले. "भारत माता की जय'च्या घोषानंतर साडेबारा वाजता मोर्चाला सुरवात झाली.

मोर्चाच्या सुरवातीला अपंग नागरिकांना प्राधान्य देण्यात आले होते. त्यानंतर मोर्चाचे मोठे फलक घेतलेल्या युवती होत्या. त्यापाठोपाठ मोर्चात सहभागी झालेले जनसागर विधान भवनाच्या दिशेने मार्गस्थ होत होता. प्रत्येकाच्या हातात विविध मागण्यांचे फलक, भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेची प्रत आणि न्यायासाठी संघर्ष करण्याचा विचार व्यक्त करत लाखो नागरिक मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चाचे नेतृत्व हाती घेतलेल्या महिला, युवती व तरुणांची संख्या लक्षणीय होती. स्वयंसेवक व कार्यकर्त्यांकडून महिलांना जागा देण्यासाठी व्यवस्था केली जात होती. कोणत्याही घोषणा न देता शांततेत हा मोर्चा निघाला. टिळक चौकातून मोर्चा लक्ष्मी रस्त्याने विधान भवनाकडे निघाला. समता सैनिक दलाच्या पथकाने आणि विविध धर्मीय संघटनांनी ठिकठिकाणी मोर्चातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय केली होती. मोठ्यांच्या हातात फलक, तर लहानग्यांच्या हातातील निळे फुगे हे चित्र लक्ष वेधून घेत होते.

मोर्चाचे लक्ष्मी रस्त्यावर आगमन होताच अनेक संस्था-संघटनांनी मोर्चाचे स्वागत केले. तर कर्वे रस्ता, लाल बहादूरशास्त्री, सातारा रस्ता, सोलापूर रस्ता, नगर रस्ता, मुंबई-पुणे महामार्गाकडून येणाऱ्या नागरिकांनी लक्ष्मी रस्त्यावर मोर्चात सहभाग घेतला. त्यामुळे उत्तरोत्तर हा मोर्चा वाढत गेला. तो पावणे तीनच्या सुमारास विधान भवनाजवळ पोचला. मोर्चात महिला मोठ्या प्रमाणात असल्याने विधान भवन परिसरात केवळ महिलांनाच परवानगी देण्यात आली. मोर्चाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर विधान भवन परिसरात सभा घेण्यात आली. शिष्टमंडळात सहभागी झालेल्या सर्व मुलींनी आपली मनोगते या वेळी व्यक्त केली. त्यानंतर राष्ट्रगीत सादर करून साडेचारच्या सुमारास मोर्चाची सांगता झाली.

Web Title: Sanvidhan Sanman Muk Morcha