सारथी संस्था बंद करणार नाही; विजय वडेट्टीवार यांची माहिती

Sarthi institute
Sarthi institute

पुणे - सारथी संस्था कोणत्याही परिस्थितीत बंद करणार नाही. याबाबत कोणीही गैरसमज करून घेऊ नये, असे ठणकावून सांगतानाच या संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कमही दिली जाईल. एवढेच नव्हे, तर मराठा समाजातील तरुण-तरुणींना नोकऱ्या, रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध होईल, यासाठी कृती आराखडा तयार करण्याचे आदेश दिले आहेत, असे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी स्पष्ट केले. 

"सारथी'वरून मराठा समाजात तणावाचे वातावरण आहे. दोन दिवसांपूर्वी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना मराठा क्रांती (मूक) मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी घेराव घालून वडेट्टीवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. दरम्यान, कोरोनाचा आढावा घेण्यासाठी वडेट्टीवार आज पुण्यात आले होते. त्यावेळी मराठा क्रांती (मूक) मोर्चाच्या सदस्यांनी त्यांना भेटून निवेदन दिले. त्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वडेट्टीवार म्हणाले, ""संस्थेमधून कोणालाही काढलेले नाही. उलट मध्यंतरी 80 जण स्वत:हून राजीनामा देऊन सोडून गेले आहेत. त्या ठिकाणी नवीन भरती करण्याच्या सूचना दिल्या आहेत. विविध संस्थांची देणी देण्यासाठी संस्थेला तीन कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत. अद्याप सात कोटी देणे आहेत. तो निधी लवकरच उपलब्ध करून दिला जाईल. याशिवाय, 38 कोटी रुपयांची आवश्‍यकता आहे. तो निधी उपलब्ध करून देण्यासाठीचा प्रस्तावही मंत्रिमंडळासमोर सादर करणार आहे.'' 

अहवालानंतर कारवाई करणार 
"सारथी' ही स्वायत्त संस्था समजून डी. आर. परिहार यांनी सरकारची मंजुरी न घेताच खर्च केला. "मी करेन तेच योग्य', अशी त्यांची भूमिका होती. मध्यंतरी याची चौकशी करण्यासाठी समिती नेमली होती. त्यामध्येही परिहार यांच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली. परंतु, काही मंत्र्यांनी या चौकशी समितीबद्दल आक्षेप नोंदविला. त्यामुळे वरिष्ठ अधिकारी सीताराम कुंटे यांच्याकडे पुन्हा चौकशीचे कामकाज दिले आहे. त्यांचा अहवाल आल्यानंतर जे जबाबदार असतील, त्यांच्यावर कारवाई करू, असेही वडेट्टीवार यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com