सरपंचांनी गावांच्या विकासासाठी सदैव तत्पर असावे : शरद पवार

मिलिंद संगई
Tuesday, 27 October 2020

सरपंचांनी परस्परसमन्वय साधून केंद्र व राज्याच्या विविध योजना समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करावा, अशी अपेक्षा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केली.

बारामती : सरपंचांनी परस्परसमन्वय साधून केंद्र व राज्याच्या विविध योजना समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करावा, अशी अपेक्षा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केली. राज्यातील सरपंच परिषदेच्या बोधचिन्हाचे अनावरण नुकतेच पवार यांच्या हस्ते झाले, त्या प्रसंगी त्यांनी ही भावना बोलून दाखवली. कोरेगाव तालुक्यातील जितेंद्र भोसले व त्यांच्या सहका-यांनी पुढाकार घेऊन सरपंच परिषदेची स्थापना केली आहे. थेट निवडून आलेल्या सरपंचांचा यात समावेश आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ग्रामीण भागातील लोकांच्या अनेक समस्या असतात, त्या समस्या शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी सरपंच परिषदेने पुढाकार घ्यावा, तसेच या परिषदेत महिलांचा सहभाग पन्नास टक्क्यांपर्यंत असेल याची काळजी घ्यावी असे सांगण्यासही पवार या वेळी विसरले नाहीत. 

परिषदेच्या माध्यमातून राज्यात संघटनेचं विभागवार जाळे निर्माण करावे,  अधिकाधिक संघटित शक्ती ग्रामपंचायतींच्या सर्वांगिण उन्नतीसाठी एकत्रित येईल व महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदललेला दिसेल, असे पवार म्हणाले. 

'दोन नंबर संस्कृती' ही कोरोनापेक्षा भयानक; बाबा आढावांची खरमरीत टीका

या अनावरण प्रसंगी सरपंच परिषदेच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी जितेंद्र भोसले नियुक्ती करण्यात आली. शरद पवार यांनी त्यांना या वेळी शुभेच्छा दिल्या. या अनावरण प्रसंगी राज्यभरातून प्रातिनिधिक स्वरूपात मंदाकिनी सावंत, शंकरबापू खापे,  अमरनाथ गीते,  रामेश्वर पाटील,  सुशील तौर, महेश पाटील, हनुमंत पवार, कोहिनूर सय्यद, सत्यपाल गावडे, रेखा कापरे, सतीश इंगवले, राजश्री खरात, सीमा देशमुख, अनिता अढारी, संतोष शेळके, चंद्रकांत सणस, संपत देशमुख, संजय शिंदे,  भाऊसाहेब मराठे, अजित माने, अजित भोसले, विष्णू गायकवाड,  जीवन जाधव, अमर भोसले, प्रताप चव्हाण, अमर माने,  रणजित पाटील, डॉ. महेश पवार, शीतल देशमुख, प्रशांत गोरड, राजेंद्र पाटील उपस्थित होते. प्रास्ताविक जितेंद्र भोसले यांनी केले, ज्ञानेश्वर वायाळ यांनी आभार मानले. 

(संपादन : सागर डी. शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sarpanch should always be ready for village development says Sharad Pawar