रुग्णांचा ‘ससून’कडे ओढा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

पुणे - ससून रुग्णालयामध्ये उपचारांसाठी जाणाऱ्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण गेल्या बारा वर्षांमध्ये ६१ टक्‍क्‍यांनी वाढले आहे. याचबरोबर सर्वच सरकारी रुग्णालयांमध्ये रुग्णांचे प्रमाण वाढल्याचे समोर आले आहे. 

पुणे - ससून रुग्णालयामध्ये उपचारांसाठी जाणाऱ्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण गेल्या बारा वर्षांमध्ये ६१ टक्‍क्‍यांनी वाढले आहे. याचबरोबर सर्वच सरकारी रुग्णालयांमध्ये रुग्णांचे प्रमाण वाढल्याचे समोर आले आहे. 

शहरात वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाचे ससून सर्वोपचार रुग्णालय हे प्रमुख सरकारी रुग्णालय आहे. त्यापाठोपाठ औंध जिल्हा रुग्णालय आणि महापालिकेची १४ रुग्णालये आहेत. यात उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याची माहिती पुढे आली आहे. ससून रुग्णालयात २००६ मध्ये ५० हजार ५०८ रुग्ण दाखल झाले होते. 

ही संख्या चालू वर्षात आतापर्यंत ८१ हजार ६०७ वर गेली आहे. ससून रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांची संख्या गेल्या बारा वर्षांमध्ये ६१ टक्‍क्‍यांनी वाढली आहे. शहरात एका बाजूला खासगी रुग्णालयांची संख्या वाढत आहे, त्यामुळे त्यांच्या खाटांची क्षमताही वाढत आहे. 

उपनगरांसाठी शहराला लागून असलेल्या ग्रामीण भागात नमांकित साखळी रुग्णालयेही आपला पाया भक्कम करत आहेत. याचवेळी सरकारी रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी जाणाऱ्या रुग्णांची संख्या गेल्या बारा वर्षांपासून वाढत आहे, असे निरीक्षण सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी नोंदविले आहे.

ससून रुग्णालयाचा गेल्या सात वर्षांपासून कायापालट झाला आहे. वैद्यकीय सेवेची गुणवत्ता वाढली असून स्वच्छता, रुग्णांची काळजी, त्यांची सुरक्षितता यावर भर देण्यात येत आहे. त्यामुळे मध्यमवर्गीय रुग्ण उपचारासाठी ससूनकडे वळत आहेत. 
- डॉ. मुरलीधर तांबे, अधिष्ठाता, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय

सरकारी रुग्णालयांकडे कल का?
 मोठ्या रुग्णालयांतील वैद्यकीय सेवा सामान्यांच्या आवाक्‍याबाहेर 
 सरकारी रुग्णालये अद्ययावत वैद्यकीय सुविधांनी सुसज्ज 
 सरकारी रुग्णालयांमध्ये स्वच्छता, सुरक्षितता, रुग्णसेवेची गुणवत्ता वाढली 
सरकारी रुग्णालयांची प्रतिमा सुधारली

प्रसूती व शस्त्रक्रियांची संख्या वाढली
ससून रुग्णालयात २०१२ मध्ये लहान आणि मोठ्या मिळून १८ हजार ५९ शस्त्रक्रिया झाल्या. ही संख्या चालू वर्षात आतापर्यंत ५७ हजार ४७१ वर पोचली. रुग्णालयात २००६ मध्ये नैसर्गिक प्रसूती ७ हजार ६६५ झाल्या होत्या. ही संख्या चालू वर्षात आतापर्यंत दहा हजारांवर गेली आहे.

Web Title: Sasoon Hospital Patient Treatment