सासवडला कर थकबाकीदारांचे नळजोड तुटू लागले

श्रीकृष्ण नेवसे
रविवार, 18 मार्च 2018

सासवड नगरपालिकेचे मुख्याधिकारी विनोद जळक, करनिर्धारण विभाग प्रमुख रंजना दुर्गाडे (साबळे), माऊली गिरमे यांच्या नेतृत्वाखाली या आठवड्यात पाच पथके सज्ज केली आहेत. यात जप्ती पथकात स्वतः अधिकारी व कर्मचाऱयांचा समावेश आहे. त्यांना प्रतिदिनी अधिकाधिक वसूलीचे, तसेच किमान पाच याप्रमाणे नळजोड तोडण्याचे व पुढच्या टप्प्यात लगेच जप्तीची कार्यवाही करण्याचे आदेश आहेत.

सासवड (जि. पुणे) - येथील नगरपालिकेने घरपट्टी - पाणीपट्टी वसुलीचे शंभर टक्के उद्दीष्ट ठेवल्याने करनिर्धारण विभागाची पाच पथकांव्दारे वसूली मोहिम कडक करण्यात आलेली आहे. त्यातून अधिक थकबाकी असलेल्या मालमत्ताधारकांची दर्शनी भागात लावण्याची यादी तयार केली असून आज कित्येकजणांचे नळजोड तोडले. तर पुढचा टप्पा मालमत्ता जप्त असेल, असेही सांगण्यात आले. 

सन 2017-18 वर्षात ही करवसूली शंभर टक्के करण्याचे धोरण निश्चित आहे. पालिकेचे मुख्याधिकारी विनोद जळक, करनिर्धारण विभाग प्रमुख रंजना दुर्गाडे (साबळे), माऊली गिरमे यांच्या नेतृत्वाखाली या आठवड्यात पाच पथके सज्ज केली आहेत. यात जप्ती पथकात स्वतः अधिकारी व कर्मचाऱयांचा समावेश आहे. त्यांना प्रतिदिनी अधिकाधिक वसूलीचे, तसेच किमान पाच याप्रमाणे नळजोड तोडण्याचे व पुढच्या टप्प्यात लगेच जप्तीची कार्यवाही करण्याचे आदेश आहेत. ज्या मालमत्ताधारकांची थकबाकी व चालु बाकी वीस हजार रुपये किंवा त्यापुढे आहे. त्यांच्या यादीतील मालमत्ताधारकांची नावे चौका चौकात प्रसिध्द करण्यात येणार आहेत. त्याशिवाय दुसऱया बाजूने थकीत मालमत्ताधारकांचे नळजोड तोडण्यास सुरवात केली आहे. हे नळजोड पूर्ण वसुली होईपर्यंत जोडली जाणार नाहीत. त्यासही जादाचा दंड राहील. तर मालमत्ता जप्ती मात्र आणखी तीव्र असेल., असेही इशाऱयात रंजना दुर्गाडे व माऊली गिरमे यांनी स्पष्ट केले आहे. 

पालिकेची घरपट्टी वसूली 60 टक्के व पाणीपट्टी वसूली 73 टक्क्यांपर्यंच आहे. ही वसूली 100 टक्क्यांवर नेण्यास कमी कालावधी आहे. त्यामुळे भरणा करण्यासाठी सुटीच्या दिवशीही सकाळी आठ ते रात्री आठ दरम्यान नागरी सुविधा केंद्र पालिकेत सुरु ठेवले आहे. या पाच पथकांबरोबरच शासकीय मालमत्तांचा मालमत्ता कर व पाणीपट्टी जमा करण्यासाठी पालिकेने आणखी एक पथक तयार केले आहे. या वसूली मोहिमेअंतर्गत पालिकेने जप्ती केलेल्या मालमत्ताधारकांची नावे वर्तमानपत्रात प्रसिध्द केली जाणार आहेत, अशी माहिती मुख्याधिकारी श्री. जळक यांनी दिली. घरपट्टी, पाणीपट्टी भरण्यासाठी रोज ध्वनीक्षेपकावरील दवंडीव्दारे आवाहन केले जात आहे. नागरीकांनी कारवाईची वेळ येऊ न देता भरणा करुन सहकार्य करावे., असेही नगराध्यक्ष मार्तंड भोंडे यांनी आवाहनात सांगितले.  

Web Title: sasvad pune tax procurement department action