पुरंदर तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचा रास्ता रोको

श्रीकृष्ण नेवसे
बुधवार, 23 ऑगस्ट 2017

पुरंदर उपसा  जलसिंचन योजनेच्या सर्व वितरिकांच्या संपूर्णतः व्हॉल्व्हमधून प्रत्येक लाभार्थी गावांच्या ओढे - नाल्यात मोफत पाणी सोडावे अशी मागणी आहे. सहा सप्टेंबर ही अखेरची मुदत असेल

सासवड - पुरंदर तालुक्याचे पाऊसमान घटल्याने गेली कित्येक दिवस पिण्याच्या पाण्यासाठी शासनाचे टँकर मागावे लागत आहेत. तर ते न मिळणाऱया सर्वसामान्यांना वणवण भटकावे लागत आहे. शेतात पिके धोक्यात आहेत. राज्यमंत्री असलेल्या इथल्या लोकप्रतिनीधीचे मात्र याकडे दुर्लक्ष आहे. त्यामुळे शासनाने आता संपूर्ण पुरंदर तालुका दुष्काळी म्हणून जाहीर करावा. सहा सप्टेंबरपर्यंत निर्णय न घेतल्यास पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन करु., असा इशारा पुणे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष संजय जगताप यांनी आज रास्ता रोको आंदोलनाच्या वेळी केली. 

सासवड (ता. पुरंदर, जि. पुणे) येथील एस. टी. बसस्थानकासमोर पुणे - पंढरपूर राज्यमहामार्गावर आज काँग्रेस जिल्हाध्यक्ष श्री. जगताप यांच्या नेतृत्वाखाली पुरंदर तालुका काँग्रेसच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला. त्यावेळी श्री. जगताप बोलत होते. तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप पोमण, जि. प. सदस्य दत्तात्रय झुरंगे, पं. स. सदस्या सुनीता कोलते, सोनाली यादव, निरा बाजार समितीचे संचालक नंदकुमार जगताप, नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, युवक काँग्रेसचे विकास इंदलकर, प्रा. सचिन दुर्गाडे, दिलीप धुमाळ, नगरसेवक अजित जगताप, गणेश जगताप, विशाल हरपळे आदी मान्यवरांसह काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते.

पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील खरीप हंगाम वाया गेला आहे. जेजुरीनजिक नाझरे धरण जलाशयात पाणी नसल्याने येथील गावोगावच्या पाणी पुरवठा योजना बंद पडल्या आहेत. अशा परिस्थिती लोकप्रतिनिधी (राज्यमंत्री विजय शिवतारे यांचे नाव न घेता) याकडे लक्ष देण्याऐवजी सध्या `गुंजवणी` धरणाबाबत सुरु असलेली टिकाच जनतेला पाहावी लागत आहे., असे सांगून श्री. जगताप म्हणाले., पुरंदर उपसा  जलसिंचन योजनेच्या सर्व वितरिकांच्या संपूर्णतः व्हॉल्व्हमधून प्रत्येक लाभार्थी गावांच्या ओढे - नाल्यात मोफत पाणी सोडावे अशी मागणी आहे. सहा सप्टेंबर ही अखेरची मुदत असेल. अन्यथा त्यानंतर तालुक्यातील जनता आपले कुटुंबिय घेऊन सारा संसार पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मांडेल. तिथे हल्लाबोल करेल. तालुकाध्यक्ष श्री. पोमण यांनी प्रास्तविकात संपूर्ण कर्जमाफी, चारा डेपो, चारा छावण्या, जळालेल्या पिकांचे पंचनामे, शेतीपंपांचे वीजबिल माफी आदी मागण्या मांडल्या. मागण्या मान्य न झाल्यास सहा सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यलयावर जाऊन आंदोलन केले जाईल., असेही स्पष्ट केले

Web Title: saswad news: agitation drought congress