पुणे जिल्ह्यातील सातबारा लवकरच होणार डिजिटल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 मे 2018

पुणे - पुणे शहराच्या जुन्या हद्दीतून आता सातबारा उतारा हद्दपार करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे बनावट सातबारा उतारा तयार करून मालमत्ता खरेदी-विक्रीच्या व्यवहारांना आळा बसण्यास मदत होणार आहे.

पुणे - पुणे शहराच्या जुन्या हद्दीतून आता सातबारा उतारा हद्दपार करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे बनावट सातबारा उतारा तयार करून मालमत्ता खरेदी-विक्रीच्या व्यवहारांना आळा बसण्यास मदत होणार आहे.

महापालिकेच्या हद्दीत यापूर्वी भूमी अभिलेख विभागाकडून सर्व मिळकतींचे प्रॉपर्टी कार्ड तयार करण्यात आले आहे. असे असतानाही अनेक ठिकाणी जागांच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारावेळी सातबारा उताऱ्यांचा वापर केला जातो. त्यातून अनेक प्रश्‍न निर्माण होतात.

त्यामुळे जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले, 'पुणे शहरात अद्याप आठ हजार मिळकतींचे सातबारा उतारे आहेत. त्यापैकी एक आठवड्यापूर्वी तीन हजार मिळकतींचे सातबारा उतारे बंद करून प्रॉपर्टी कार्ड तयार करण्यात आले आहे. उर्वरित सातबारा उताऱ्यांचे प्रॉपर्टी कार्डदेखील तयार करण्याचे काम वेगाने सुरू आहे.''

मात्र महापालिका हद्दीत 1995 मध्ये समाविष्ट झालेल्या 23 गावांतील काही मिळकतींचे प्रॉपर्टी कार्ड अद्याप तयार झालेले नाहीत. त्या मिळकतींच्या प्रॉपर्टी कार्डचे काम लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले;

तर एक ऑगस्टपर्यंत हवेलीसह पुणे जिल्ह्यातील सर्वच गावांमध्ये डिजिटल सातबारा उतारा उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनाकडून हाती घेण्यात आले आहे. आतापर्यंत सहा तालुक्‍यांचे काम पूर्ण झाले आहे. हवेली वगळता उर्वरित तालुक्‍यांचे डिजिटल सातबारा उतारे तयार करण्याचे काम वेगाने सुरू आहे. एक ऑगस्टपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात डिजिटल सातबारा उतारा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Web Title: sat bara digital in pune