वेळू (ता. भोर) - सातारा रस्त्यावर रविवारी झालेली वाहतूक कोंडी.
वेळू (ता. भोर) - सातारा रस्त्यावर रविवारी झालेली वाहतूक कोंडी.

सातारा, नगर, सोलापूर रस्त्यांवर कोंडी

पुणे - सातारा, नगर व सोलापूर या प्रमुख रस्त्यांसह शहराच्या वेगवेगळ्या भागांत रविवारी सायंकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे दोन ते तीन तास वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. लग्न, यात्रा, सुट्यांहून परत येणारी वाहने आणि उड्डाण पुलाच्या सुरू असलेल्या कामामुळे कोंडीत भर पडली.

प्रजासत्ताक दिनाला जोडून आलेल्या रविवारच्या सुटीमुळे अनेक नागरिक फिरण्यासाठी गेले होते. रविवारी सायंकाळी बहुतांश नागरिक शहरामध्ये परतत होते. त्यातच वेगवेगळ्या यात्रांनाही नागरिक गेल्याने त्यांच्याही वाहनांची गर्दी झाल्याने सातारा महामार्गावर गर्दी झाली. त्यातच खेड-शिवापूर येथे उड्डाण पुलाचे काम सुरू असल्याने वाहतूक संथगतीने सुरू होती. त्यामुळे कोंडीत भर पडत गेली. असंख्य वाहनचालक दोन ते तीन तास कोंडीत अडकले होते. सातारा महामार्गाहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या रस्त्यावर वाहतूक कोंडी असल्याने अनेक वाहनांनी पर्यायी मार्गाने जाण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, खडकवासला धरणाकडून सिंहगड रस्त्यावर कोल्हेवाडी, किरकटवाडी फाटा, नांदेडहून पुण्याकडे येणाऱ्या रस्त्यावरही कोंडी झाली होती. कोंढवे धावडे व खडकवासला येथून उत्तमनगरमार्गे पुण्याकडे येणाऱ्या वाहनांची संख्या मोठी होती. 

राजकीय क्षेत्रातील दोन कुटुंबांतील मुला-मुलीचा रविवारी नगर रस्त्यावरील महालक्ष्मी लॉन्स येथे विवाह सोहळा होता. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून विविध राजकीय पक्षांतील नेत्यांपासून कार्यकर्त्यांनी हजेरी लावली. त्यामुळे नगर रस्त्यावर सायंकाळी सहापासूनच वाहनांच्या रांगा लागण्यास सुरवात झाली. वाघोली ते चंदननगर परिसरात सायंकाळी सहा वाजल्यानंतर अनेक वाहनचालकांचे काही तास वाहतूक कोंडीमध्ये गेल्यामुळे त्यांना मनस्ताप सहन करावा लागला. सोलापूर व नाशिक रस्त्यावरही सुटीवरून परतणाऱ्या नागरिकांच्या वाहनांमुळे सायंकाळी कोंडीत भर पडली.

एम्प्रेस गार्डनसमोरही गर्दी
एम्प्रेस गार्डनमध्ये भरविलेले पुष्पप्रदर्शन पाहण्यासाठी रविवारी पुणेकरांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. बहुतांश नागरिक कुटुंबासह प्रदर्शन पाहण्यासाठी आपल्या गाडीने आले होते. त्यामुळे एम्प्रेस गार्डनसमोरील रस्त्यासह अन्य रस्त्यांवरही वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र रविवारी सायंकाळी दिसले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com