शहरात सीसीटीव्हीसाठी शंभर ठिकाणे निश्‍चित

प्रवीण जाधव
सोमवार, 4 सप्टेंबर 2017

पोलिस अधीक्षकांचा संकल्प; ‘एक गणपती एक सीसीटीव्ही’ उपक्रमात मदतीचे आवाहन
सातारा - शहरातील गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या सीसीटीव्ही उपक्रमासाठी शहरातील शंभर ठिकाणे निश्‍चित केली आहेत. याबाबतचा सविस्तर अहवाल तयार करून निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

पोलिस अधीक्षकांचा संकल्प; ‘एक गणपती एक सीसीटीव्ही’ उपक्रमात मदतीचे आवाहन
सातारा - शहरातील गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या सीसीटीव्ही उपक्रमासाठी शहरातील शंभर ठिकाणे निश्‍चित केली आहेत. याबाबतचा सविस्तर अहवाल तयार करून निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

लोकसंख्या वाढ व उपलब्ध पोलिस दल यांचे अत्यंत व्यस्त प्रमाण आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी पोलिसांची उपलब्धता शक्‍य होणार नाही. त्यामुळे गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी आधुनिक उपकरणांचा उपयोग करणे अत्यावश्‍यक बनले आहे. सीसीटीव्हीचा त्यात अत्यंत महत्त्वाचा उपयोग होत असल्याचे समोर आले आहे. महिलांची छेडछाड, चौकाचौकांतील टवाळगिरी, मंगळसूत्र हिसकावणे, मारामारी, चोऱ्या अशा गुन्ह्यांना सीसीटीव्हीच्या वापराने प्रतिबंध बसतो. त्याचबरोबर झालेले गुन्हे उघडकीस आणण्यास मोठी मदत होते. त्यामुळे शहरात सीसीटीव्ही प्रकल्प राबविण्याचा संकल्प पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी केला आहे.

त्याचाच एक भाग म्हणून सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांना त्यांची यंदाच्या वर्षी ‘एक गणपती एक सीसीटीव्ही’ उपक्रमात मदत करण्याचे आवाहन केले आहे. त्याच अनुषंगाने ‘सकाळ’ने गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊन सीसीटीव्ही प्रकल्पासाठी मदत करण्याचे आवाहन केले. या बैठकीमध्ये शहरातील सीसीटीव्हींची आवश्‍यक ती ठिकाणे याचा आरखडा पोलिसांकडून घ्यावा असा विषय पुढे आला. तसा आराखडा करण्यात आल्याचे पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी सांगितले. तसेच फेरआढावा घेऊन शहरातील शंभर ठिकाणे निश्‍चित करण्यात आली. 

चार ठिकाणांहून नियंत्रण
शहरात विविध ठिकाणी बसविल्या जाणाऱ्या सीसीटीव्हींच्या नियंत्रणाचा मुद्दा महत्त्वाचा आहे. पोलिस अधीक्षक कार्यालय, शहर पोलिस ठाणे, शाहूपुरी पोलिस ठाणे व नियंत्रण कक्षातून या सीसीटीव्ही प्रकल्पाचे नियंत्रण करण्याचे नियोजन आहे.

सीसीटीव्हीची आवश्‍यकता असणारी ठिकाणे 
शहरातील प्रवेश करणारी ठिकाणे व सीसीटीव्हीची संख्या ः वाढे फाटा (३), खेड फाटा (२), अजंठा चौक (३), शिवराज फाटा (२), मोळाचा ओढा (३), बोगदा (४), बॉम्बे रेस्टॉरंट (४).

शहरातील ठिकाणे व सीसीटीव्ही संख्या - शिवाजी सर्कल (५), जनता बॅंक (३), शाहू चौक (३), समर्थ मंदिर (३), चाँदणी चौक (५), गोलबाग (५), देवी चौक (२), कमानी हौद (३), पोलिस मुख्यालय (३), मोती चौक (३), न्यू इंग्लिश स्कूल (२), राधिका चौक (२), शनिवार चौक (३), मंगळवार तळे (१), शाहूपुरी चौक (२), शाहूपुरी पोलिस ठाणे (२), मुख्य बस स्थानक परिसर (६), भूविकास बॅंक (३), पारंगे चौक (२), तहसीलदार कार्यालय (२), जिल्हाधिकारी कार्यालय (२), यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालय (१), साईबाबा मंदिर (२). 

Web Title: satara news 100 places cctv watch in satara