धावेल तर सुरक्षितच

मंगेश कोळपकर 
सोमवार, 14 मे 2018

पुणे - सातारा रस्त्यावरील बीआरटीचे काम सुरू असताना पादचारी हा घटक वाऱ्यावर सोडला जाणार नाही. बीआरटी थांब्यांपर्यंत त्यांना सुरक्षितपणे जाता येईल, यासाठी तातडीने उपाययोजना केल्या जातील. लोखंडी बॉक्‍स बॅरिकेड्‌सची पाहणी करून आवश्‍यकता भासल्यास त्यात बदल केला जाईल, असे महापालिका प्रशासनाने रविवारी स्पष्ट केले. 

पुणे - सातारा रस्त्यावरील बीआरटीचे काम सुरू असताना पादचारी हा घटक वाऱ्यावर सोडला जाणार नाही. बीआरटी थांब्यांपर्यंत त्यांना सुरक्षितपणे जाता येईल, यासाठी तातडीने उपाययोजना केल्या जातील. लोखंडी बॉक्‍स बॅरिकेड्‌सची पाहणी करून आवश्‍यकता भासल्यास त्यात बदल केला जाईल, असे महापालिका प्रशासनाने रविवारी स्पष्ट केले. 

सातारा रस्त्यावर कात्रज चौक ते साईबाबा मंदिरदरम्यान ५. ४ किलोमीटरच्या रस्त्याच्या पुनर्रचनेचे काम सध्या सुरू आहे. त्यावर बीआरटी मार्गही उभारण्यात येत आहे. त्यासाठी महापालिका सुमारे ७५ कोटी रुपये खर्च करीत आहे. या रस्त्यावर बीआरटीचे थांबे पूर्वी चौकाजवळ होते. आता ते चौकांपासून सुमारे १२ ते २५ मीटर अंतरावर आले आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणे जिकिरीचे होणार आहे. त्यामुळे थांब्यापर्यंत सुरक्षितपणे पोचण्यावर मर्यादा आल्या आहेत. या बीआरटी मार्गावरील त्रुटींबाबत ‘सकाळ’ने वृत्तमालिका प्रसिद्ध केली आहे. या पार्श्‍वभूमीवर पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी विविध उपाययोजना करण्याचे आश्‍वासन प्रशासनाने दिले.

सर्व त्रुटी दूर करणार - पावसकर
सातारा रस्त्यावर बीआरटी थांब्यांपर्यंत पोचण्यासाठी पादचाऱ्यांना रस्ता सुरक्षितपणे ओलांडता यावा, यासाठी पादचारी मार्ग विकसित करणे, पादचारी सिग्नल बसविणे, फलक लावणे आदी उपाययोजना केल्या जातील. लोखंडी बॉक्‍स बॅरिकेड्‌सची रचना गरज भासल्यास बदलली जाईल. हा रस्ता वाहतुकीला खुला करण्यापूर्वी सर्व त्रुटी दूर करू, असे महापालिकेच्या पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितले.

बीआरटी मार्गांवर पादचारी सुरक्षितता आणि वाहतूक सुरक्षित व्हावी, यासाठी समिती स्थापन केली आहे. या समितीकडून होणाऱ्या पाहणीच्या अनुषंगाने कोणत्या सुधारणा व्हायला पाहिजे, हे पालिकेला कळविले जाईल. सुरक्षितता निर्माण झाल्यावरच वाहतूक सुरू करू. 
- नयना गुंडे, अध्यक्ष, पीएमपी

बीआरटी मार्ग हे स्वतंत्रच असले पाहिजे. त्यावर वाहतूक आणि पादचाऱ्यांसाठी सुरक्षितता हवीच. त्यासाठी महापालिकेने उपाययोजना केल्या पाहिजेत. तसेच, बीआरटीची बससेवा विश्‍वासार्ह हवी. बीआरटीबाबत नागरिकांत जागरूकता निर्माण करायला हवी. 
- निखिल मिजार, बीआरटी अभ्यासक

Web Title: Satara Road BRT Divider Municipal Administrative