महावितरणमुळे सातारा रस्त्यावरील पुनर्विकास रखडला 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

पुणे : सातारा रस्ता बीआरटी मार्गातील धनकवडी येथील पुनर्विकासाचे काम महावितरणच्या दिरंगाईमुळे रखडल्यामुळे नागरिक व व्यापाऱ्यांची गैरसोय होत आहे. 

पुणे : सातारा रस्ता बीआरटी मार्गातील धनकवडी येथील पुनर्विकासाचे काम महावितरणच्या दिरंगाईमुळे रखडल्यामुळे नागरिक व व्यापाऱ्यांची गैरसोय होत आहे. 
धनकवडी फाटा येथील शाहू बॅंक चौक ते अहल्या देवी चौकादरम्यानच्या या कामास अडथळा ठरणारी महावितरणची भूमिगत केबल स्थलांतरित करण्याचे काम तब्बल दोन महिने रखडले आहे.
या अंतरात चार महिन्यांपूर्वी खोदाई झाली. धनकवडी फाट्यापासून पुढील सत्तर मीटरचे काम वेगाने झाले. मात्र उर्वरित भागातील मलनिस्सारण वाहिन्या, पावसाळी वाहिन्यांची कामे थांबली. महावितरणची बावीस किलो व्होल्ट क्षमता असलेल्या दोन केबल या कामासाठी अडथळा ठरू लागल्या. कात्रज येथील राजीव गांधी पंपिंग स्टेशन कार्यान्वित करणारी अति उच्चदाब केबल स्थलांतरित करण्याची नामुष्की पथ विभागावर आली.
याबाबत नगरसेवक विशाल तांबे यांनी पाठपुरावा केला होता. मार्गाकडेला नवीन केबल टाकण्याचा खर्चही महापालिका देणार असल्याचे निश्‍चित झाले. परंतु या कामासाठी आवश्‍यक असणाऱ्या खर्चाचे अंदाजपत्रक देण्याच्या कामाला महावितरणने तब्बल दोन महिने लावले, अशी माहिती नगरसेवक तांबे यांनी दिली. तांबे म्हणाले, की नागरी हिताचा विचार करून संबंधित विभागांची तीन वेळा बैठक घडवून आणली आहे. केबल टाकण्याचे काम होताच उर्वरित दीडशे मीटरचा पुनर्विकास वेगाने केला जाणार आहे. 

'' पुनर्विकासाच्या कामात मलनिस्सारण वाहिन्या आणि पावसाळी वाहिन्यांची कामे करताना महावितरणच्या केबलचा अडथळा झाला. अति उच्चदाब केबलचे स्थलांतर करण्यासाठी महावितरणकडून अपेक्षित असलेली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नव्याने केबल टाकण्याचे काम दहा दिवसांत पूर्ण होईल.''
- पांडुरंग तावरे, उपअभियंता पथविभाग 

''पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर विभागवार खंडित होणारी वीज आणि अभियंत्यांवर आलेला कामाचा ताण या दिरंगाईसाठी कारणीभूत ठरला आहे. पुनर्विकासाच्या कामात महावितरणकडून आवश्‍यक त्या प्रक्रिया आठवडाभरात पूर्ण केल्या जातील.'' 
- मधुसूदन बरकडे, कार्यकारी अभियंता, महावितरण 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: satara road development delay