मायलेकींची आगळी वेगळी पुस्तक‘वारी’

नीला शर्मा
गुरुवार, 9 मार्च 2017

मूळची पुण्याची असलेली सती रॉबिन हॉलशी लग्न झाल्यावर काही वर्षे ऑस्ट्रेलियात होती. तिची मुलगी मना शाळेत कधी जायची, कधी नको म्हणायची. सतीनं तिला शाळेची सक्ती न करता, आपलं आपण अनुभव घेत बरंच काही शिकायला पाठिंबा दिला.

त्या मायलेकींना वाचायची खूपच आवड. इतकी, की घरभर पुस्तकंच पुस्तकं. त्या दोघींना निवांतपणा अनुभवायची आणि तो इतरांमध्ये प्रवाहित करण्याचीही तेवढीच ओढ. सती भावे आणि तिची मुलगी मना या दोघींनी पुण्यातल्या कर्वे रस्त्यावरील करिश्‍मा चौकाजवळ सुरू केलेली ‘वारी बुक कॅफे’ ही वाचन आणि निवांत क्षणांची मेजवानी देणारी अफलातून जागा आहे. चौकातून डेक्कनकडे जाताना डावीकडे दौलत सोसायटी संपते. तिथं एका इमारतीच्या पार्किंगमध्ये वारी आहे.

मूळची पुण्याची असलेली सती रॉबिन हॉलशी लग्न झाल्यावर काही वर्षे ऑस्ट्रेलियात होती. तिची मुलगी मना शाळेत कधी जायची, कधी नको म्हणायची. सतीनं तिला शाळेची सक्ती न करता, आपलं आपण अनुभव घेत बरंच काही शिकायला पाठिंबा दिला. मनासुद्धा पुस्तकांच्या सहवासात लहानाची मोठी झाली. रॉबिनची छायाचित्रण कलेची, पिआनो वाजविण्याची आणि चित्र रेखाटण्याची आवड तिच्यातही आली. सती, रॉबिन आणि मना पूर्वी भारतात वर्षातून दोन-तीनदा थोड्या दिवसांसाठी येत. दोन वर्षांपासून मात्र उलटं झालंय. चार महिन्यांपूर्वी या सगळ्यांनी हा नावीन्यपूर्ण कॅफे सुरू केला. आधीचे तीन महिने तिथं कविता, चित्रपट, नाटक, चर्चा वगैरे कार्यक्रम केले.   

‘‘इथं येणाऱ्या तरुणाईला अभिजात अनुभव घेता यावा, यासाठी हे प्रयत्न होते; पण नेहमी येणाऱ्या काहींनी शांततेचा आग्रह धरला. त्यामुळे आता रात्री दहा ते सकाळी दहा या वेळात कॅफे बंद असताना कार्यक्रम ठेवण्याचा मानस आहे,’’ असं सती सांगते. बाकी सलग बारा तास कॅफे चालू असतो. येणारे येतात, हवं ते पुस्तक निवडून कितीही वेळ वाचत बसतात. कधी स्वत:चं काही लिहित बसतात. इतरांना त्रास होणार नाही, अशा हलक्‍या आवाजात दोघे, तिघांच्या गटांमध्ये चर्चाही चालतात. चहा, कॉफी, सरबत, खाण्याचे पदार्थ पुरविणारं किचन मना अगदी मनापासून सांभाळते. नवनवे पदार्थ करण्यात तिचा हातखंडा आहे. ती म्हणते, ‘‘मला सकाळी ९  ते रात्री १२  पर्यंतही किचनमध्ये काम करावं लागलं तरी कंटाळा येत नाही. उलट आईच मला ‘आता पुरे, थोडी विश्रांती घे,’ असा आग्रह करत बाहेर आणते.

सतीचं म्हणणं असं, की आजच्या तरुणाईला सतत, धावपळ, दगदग, आवाजांच्या कलकलाटापेक्षा शांत, निवांत क्षण अनुभवायला मिळावेत. यातली आस्वादक्षमता वाढल्यावर तरुणांना स्वत:च्या आतल्या शांततेचा मार्ग सापडू शकेल. सती आणि रॉबिननं इथं एक स्वतंत्र मेडिटेशन रूमही केली आहे. ते दोघे कॉग्निटिव्ह थेरपिस्ट म्हणून मार्गदर्शकाची भूमिका बजावतात. कॅफेत येणारे पुन्हा पुन्हा येतात. इतरांना आणतात. इथली त्यांची वारी घडतच राहते. पुस्तकं, निवांत क्षण व बाहेरच्या, तसंच आतल्या जगाचा त्यांचा शोध सुरू राहतो.

Web Title: sati bhave story