सतीश काकडे साताऱ्यातील कारखान्यांना घाम फोडणार? 

संतोष शेंडकर
बुधवार, 26 सप्टेंबर 2018

सोमेश्वरनगर : फलटण (जि. सातारा) तालुक्यातील शरयू, स्वराज अशा साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना एफआरपी दिलेली नाही. 15 ऑक्टोबरपर्य़ंत कारखान्यांनी शेतकऱ्यांना एफआरपी न दिल्यास स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या सहकार्याने आंदोलन उभारणार असल्याचा इशारा शेतकरी कृती समितीचे पुणे जिल्हाध्यक्ष सतीश काकडे यांनी दिला आहे. तसेच, साखर आयुक्तांना भेटून या कारखान्यांना गाळप परवाना देऊ नये अशी कायदेशीर मागणी करणार असल्याचेही सांगितले. त्यांच्या या निर्णयाने पुणे जिल्ह्यातील कारखान्यात लढणारे काकडे आता फलटणमधील कारखान्यानाही घाम फोडतील अशी शक्यता आहे.

फलटण तालुक्यातील शरयू, न्यू फलटण शुगर व लोकनेते हिंदूराव नाईक निंबाळकर या तिन्ही खासगी साखर कारखान्यांनी 2017-18 हंगामातील पुणे जिल्ह्यातील बारामती, पुरंदर, इंदापूर या तालुक्यांमधून चांगल्या भावाचे गाजर दाखवत ऊस नेला. अतिरीक्त ऊसस्थितीचा फायदा खासगी कारखान्यांनी उचलला. आता मात्र या कारखान्यांकडून एफआरपीदेखील मिळणे मुश्कील झाले असल्याने ज्या शेतकऱ्यांनी या कारखान्यांना ऊस घातला आहे ते पस्तावले आहेत. मंगळावारी (ता. 25) माजी पंचायत समिती सदस्य अप्पाजी गायकवाड, निंबूतचे उपसरपंच उदय काकडे, शेतकरी कृती समितीचे सोमेश्वर कारखाना अध्यक्ष शहाजी जगताप, सोरटेवाडीचे माजी सरपंच श्रीपाल सोरटे, अशोक शेंडकर, सोनलकुमार शेंडकर आदींचे शेतकरी कृती समितीचे शिष्टमंडळ शरयू कारखान्याच्या प्रशासनास भेटले. या चर्चेमध्ये शिष्टमंडळाने 'ठरल्याप्रमाणे प्रतिटन 2650 रूपये दर अदा करावा. तसेच सोमेश्वर कारखान्याच्या बरोबरीने भाव देऊ हा शब्दही खरा करावा' अशी मागणी केली. परंतु समाधानकारक प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे कृती समितीने, '15 ऑक्टोबरला कारखानास्थळावर उपोषण करणार आहोत' असे निवेदन कारखान्यास दिले आहे.

या एकाच कारखान्याकडे केवळ सोमेश्वरच्या कार्यक्षेत्रातील 75 शेतकऱ्यांचा तीन-साडेतीन हजार टन ऊस आहे. या शेतकऱ्यांच्या उपोषणात सहभागी होण्याचा आणि किमान एफआरपी मिळेपर्यंत आंदोलन करण्याचा निर्णय काकडे यांनी घेतला आहे. एरवी पुणे जिल्ह्यातील कारखान्याना धडकी भरवणारे काकडे सातारा जिल्ह्यात कारखानदारांना घाम फोडतील अशी शेतकरी चर्चा करत आहेत. त्यांनी यापूर्वी राज्यातील आंदोलनालाही दिशा दिलेली आहे

गाळप परवाना थांबविणार
न्यू फलटण शुगरने शेतकऱ्यांची ऊस बिले थकविली होती. कारखान्याचे अध्यक्ष प्रल्हाद पाटील व उद्योजक राजेंद्र काकडे यांच्यातील करारानुसार शेतकऱ्यांना एक-दोन दिवसात 41 कोटींची बिले मिळण्याची शक्यता आहे. ती न मिळाल्यास त्याही शेतकऱ्यांसोबत राहणार आहे. याशिवाय नाईक निंबाळकर कारखान्यानेही शेतकऱ्यांना एफआरपी दिलेली नाही. पुणे-सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी स्वाभीमानीला घेऊन मोर्चे काढले जातील. त्यानंतरही न्याय न मिळाल्यास उपोषणाचे अस्त्र बाहेर काढणार आहे, तसेच साखरआयुक्तांना भेटून या किमान एफआरपी व्याजासह मिळत नाही तोवर यांना गाळप परवाना देऊ नये असे निवेदन देणार असल्याचे स्पष्ट केले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: satish kakade and sugar factory from satara