...तेव्हा मी सर्वाधिक श्रीमंत होतो - सतीश ननावरे

करंजेपूल (ता. बारामती) - उपस्थितांशी संवाद साधताना सतीश ननावरे (उजवीकडील).
करंजेपूल (ता. बारामती) - उपस्थितांशी संवाद साधताना सतीश ननावरे (उजवीकडील).

सोमेश्वरनगर - साडेबारा तासांच्या अथक कष्टानंतर मी सायकलवरून सीमारेषेजवळ आलो होतो. पाचशे मीटर आधीच मित्रांनी हातात तिरंगा दिला. तो फडकवत मी ऑस्ट्रियातील ट्रायथलॉन स्पर्धेची सीमारेषा निर्धारित वेळेपूर्वी ओलांडली आणि आयर्न मॅन म्हणून घोषणा झाली. जगातील हजारो माणसांत तिरंगा फडकविताना मी जगातला सर्वाधिक श्रीमंत माणूस होतो. साडेबारा तासांचे कष्ट साडेबारा मिनिटांचेच वाटत होते...

अशा शब्दांत ऑस्ट्रियात जाऊन आयर्न मॅन किताब मिळविणाऱ्या सतीश ननावरे या अवलियाने आपली कहाणी विशद केली. करंजेपूल (ता. बारामती) येथे भारत ज्ञान विज्ञान समुदाय संघटनेच्या शाखेच्या वतीने ज्ञान विज्ञान गप्पा उपक्रमांतर्गत आयोजित केलेल्या कार्यक्रमात ‘पेंटर ते आयर्न मॅन’ या विषयावर ननावरे बोलत होते. अध्यक्षस्थानी तिरुपती बालाजी ॲग्रो कंपनीचे व्यवस्थापक संजय शिंदे होते. याप्रसंगी ॲड. श्रीनिवास वायकर, सुरेश परकाळे, परेश ज. म., अजित चव्हाण, रणजित फरांदे, वंदना भोसले, राणी बालगुडे, विठ्ठल गायकवाड, विजय कोळपे, सचिन सोरटे उपस्थित होते.

ननावरे म्हणाले, ‘‘आयुष्यात चांगले शिक्षक, चांगले कुटुंब आणि मित्र मिळाले. त्यांच्या सहकार्यामुळेच प्रतिकूल परिस्थितीवर मात केली आणि यशस्वी व्यावसायिक बनलो. त्याच बळावर आयर्न मॅन बनलो. जे आवडते ते जीव लावून आणि शिस्त पाळून केले तर यश मिळतेच मिळते.’’ बाबूलाल पडवळ यांनी सामाजिक गीतांचे गायन केले. प्रा. डॉ. राहुल खरात यांनी प्रास्ताविक केले. आकाश सावळकर यांनी आभार मानले.

गुरुजींनी आधार दिला
गणवेश आणि चपला मिळायची पंचाईत होती. आई-वडील कष्टकरी होते. अन्य विषयात ‘ढ’, पण चित्रकलेत पहिला यायचा, म्हणून ओळख मिळाली. चित्रकलेतच करिअर करायच विद्यालयातच ठरवले. माझ्या मोमीन गुरुजींनी वेळोवेळी आधार दिल्याने चित्रकार बनलो. पुढे त्यातच व्यवसाय केल्याने आवडीच्या कामात राहिलो. खेड्यात वाढल्याने कुठल्याही परिस्थितीसाठी सक्षम बनलो. सायकलिंग आणि पोहण्याचा छंद जोपासला आणि आयर्न मॅन बनलो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com