साखर उद्योगपुढे नैसर्गिक व सरकारी आपत्ती : सत्यशील शेरकर

दत्ता म्हसकर
शनिवार, 13 ऑक्टोबर 2018

जुन्नर (पुणे) : साखर उद्योगाला नैसर्गिक संकटाबरोबर सरकारी पातळीवरील समस्यांना सामोरे जावे लागत आहे, असे प्रतिपादन श्री विघ्नहर साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी केले.

जुन्नर (पुणे) : साखर उद्योगाला नैसर्गिक संकटाबरोबर सरकारी पातळीवरील समस्यांना सामोरे जावे लागत आहे, असे प्रतिपादन श्री विघ्नहर साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी केले.

निवृत्तीनगर (ता.जुन्नर) येथे कारखाना कार्यस्थळावर 33 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ व गव्हाण पूजन आज शनिवारी (ता. 13) झाले. यानंतर झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. उपाध्यक्ष अशोक घोलप, सर्व संचालक, सुमित्रताई शेरकर,नंदुकाका शेरकर,अभिजित शेरकर माजी आमदार दिलीप ढमढेरे, विठ्ठलबाबा मांडे, आशा बुचके, हाजरा इनामदार, तानाजी बेनके, वैभव तांबे,संभाजी तांबे, भानुविलास गाढवे, तात्यासाहेब गुंजाळ, वैभव कोरडे,भगवान घोलप,जयवंत घोडके,कार्यकारी संचालक राजेंद्र जंगले आदी मान्यवर तसेच ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

शेरकर म्हणाले, ऊस हेच एकमेव हमीभाव देणारे पीक आहे मात्र अपुरा पाऊस,हुमणीचा प्रादुर्भाव,ऊस जळीत आदी नैसर्गिक आपत्तीला ऊस उत्पादक शेतकऱ्याला सामोरे जावे लागत आहे तर शेतकऱ्यांना एफआरपी ची पूर्ण रक्कम देण्यात येणाऱ्या अडचणी, देशांतर्गत साखरेचे अतिरिक्त उत्पादन, बाजारभाव याबरोबर आयकर खात्याच्या नोटिसा या सरकारी आपत्तीचा सामना करावा लागत आहे. कार्यक्षेत्रातील सर्व उसाचे गाळप करण्याचे नियोजन केले आहे मात्र सहवीज निर्मीतीचा करार प्रश्न अद्यापही बाकी आहे. वीज करार वेळेवर न झाल्यास नुकसानच होण्याची शक्यता आहे यावर्षीची एफआरपी देण्यास सर्वच कारखान्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. 

माजी आमदार दिलीप ढमढेरे म्हणाले, शेतकर्‍यांवर अन्याय करण्याची विद्यमान राजकर्त्यांची पद्धत असून शेतकरी हिताचे निर्णय होण्यासाठी सर्वांनी एकत्र येवून आंदोलनाचा पवित्रा घेण्याची वेळ आली आहे.                

आमदार शरद सोनवणे यांनी भेट देवून गाळप हंगामास शुभेच्छा व्यक्त केल्या. आशा बुचके, तान्हाजी बेनके यांची भाषणे झाली. सुत्र संचालन सुहास शेटे यांनी केले. आभार अशोक घोलप यांनी मानले.

राज्यातील ज्या साखर कारखान्यांना २००४-०५ ते २०१४-१५ या कालावधीत सरकारने ठरविलेल्या दरापेक्षा जास्त ऊसदर दिला त्यांना आयकर विभागाने नोटीसा पाठविल्या असून विघ्नहर कारखान्यासही २०१ कोटी रुपये आयकर भरणेबाबत नोटीस कालच मिळाली असल्याचे सत्यशील शेरकर यांनी सांगितले. याबाबत साखर कारखान्यांची साखर संघामार्फत सुप्रिम कोर्टामध्ये दावा सुरू असून त्याचा पाठपुरावा असला तरी सदरची टांगती तलवार सर्वच साखर कारखान्यांवर राहणार असल्याचे शेरकर यांनी स्पष्ट केले. 

साध्या पद्धतीचा अवलंब
श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे ३३ व्या गळीत हंगामाच्या गव्हाण पुजनाचा कार्यक्रम आज शनिवारी ता.१३ सकाळी विद्यमान संचालक मंडळ आणि उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते साध्या पध्दतीने संपन्न करण्यात आला. कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिका देखील काढण्यात आल्या नव्हत्या.आतापर्यंत विविध मान्यवरांचे हस्ते हा कार्यक्रम झाला पण संचालकांना यावेळी प्रथमच संधी मिळाली.सुरवातीला सत्यशील शेरकर आणि योगिता शेरकर उभयतांच्या हस्ते विधीवत गव्हाणपुजन करण्यात आले नंतर गव्हाणीत मोळी टाकण्यात आली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: satyashil sherkar talks about sugarcane factory