युवावर्गाचा ‘सत्यशोधक’ हुंकार

युवावर्गाचा ‘सत्यशोधक’ हुंकार

पुणे - सध्या आपण सगळे आभासी (व्हर्च्युअल) युगात वावरत आहोत. तेच सत्य मानून चाललो आहोत, हे भीषण वास्तव आहे. म्हणूनच प्रत्येकाने सत्यशोधक वृत्ती जोपासली पाहिजे; तसेच सत्यशोधक विचार समाजात रुजविण्याची जबाबदारी आपण तरुणांनी घेतली पाहिजे, असा सूर सत्यशोधक युवा परिषदेत उमटला.

सत्यशोधक समाजाच्या १४६व्या वर्धापन दिनानिमित्त अभ्यासिका विद्यार्थी समिती, महात्मा फुले समता प्रतिष्ठान, मुस्लिम सत्यशोधक मंडळ, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, छात्रभारती विद्यार्थी संघटना आणि एस. एम. जोशी सोशलिस्ट फाऊंडेशनने या परिषदेचे आयोजन केले होते. ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव आणि सुभाष वारे यांसह अप्सरा आगा, छाया काविरे, रुक्‍सार मुल्ला, रोहिणी जाधव, राहुल माने, अक्षय राऊत, प्रवीण गुंजाळ, अरिहंत मलकापुरे, देविदास शिंदे यांनी विचार मांडले. सत्यशोधक पद्धतीने आम्ही विवाह करू, अशी शपथही या वेळी युवकांनी घेतली.

वारे म्हणाले, ‘‘महात्मा फुले यांनी सत्यासाठी सत्यशोधन समाजाची निर्मिती केली. त्यांचा विचार पुढे नेण्यासाठी पुढील वर्षी मोठ्या स्वरूपात ही परिषद घेऊ.’’ आगा म्हणाली, ‘‘सध्या  अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेतले जात आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता या बाबी धूसर होत आहेत. हे का होत आहे, याचा तरुणांनी विचार  करण्याची गरज आहे.’’

मुल्ला म्हणाली, ‘‘सत्यशोधक विचार समाजात रुजविण्याची जबाबदारी तरुणांनी घेतली पाहिजे. कारण हाच वर्ग प्रवाही असतो.’’ राऊत म्हणाला, ‘‘उच्चशिक्षित लोक कर्मकांड करून नवस करतात, हे पाहून आजही सत्यशोधक विचारांची समाजाला गरज असल्याची खात्री पटते.’’ काविरे हिने, समाजात अनेक समस्या असूनही तरुण त्याविषयी बोलत नाहीत. पण सोशल मीडियाला चिकटून राहतोय, याबद्दल खंत  व्यक्त केली.

संविधान जपण्याची गरज
अंधश्रद्धेने लोकांना का वेडे केले आहे? त्यासाठीच सत्यशोधक विचारांची आज गरज आहे, असे सांगत डॉ. आढाव यांनी युवकांना संविधान जपण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले, ‘‘कोणताही राजकीय पक्ष संविधान जपत नाही. घटनेतील भारत घडवायचा असेल, तर सत्यशोधनाशिवाय पर्याय नाही.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com