पुण्याचा सौरभ पवार बनला भूगर्भशास्त्रज्ञ

Saurabh-Pawar
Saurabh-Pawar

पुणे - गिर्यारोहणाची आवड असणाऱ्या सौरभ पवार यांना भूगर्भशास्त्रात रस वाटू लागला. मग हाच करिअरचा मार्ग त्यांनी निवडला. या क्षेत्रातील शिखर गाठायचे म्हणून पदवी, पदव्युत्तर पदवी शिक्षण घेत त्यांनी स्पर्धा परीक्षेची वाट धरली. 

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत त्यांनी देशात तिसरा क्रमांक मिळविला. ते लवकरच भूगर्भशास्त्रज्ञ म्हणून रुजू होतील. आंबेगाव पठार येथील सौरभ यांनी ‘कम्बाईन जिओ सायंटिस्ट ॲण्ड जिओलॉजिस्ट’ परीक्षेत हे यश मिळविले. त्यांचे शालेय शिक्षण ज्ञानप्रबोधिनी शाळेत झाले. 

बारावीनंतर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी असणाऱ्या प्रवेश परीक्षेतही चांगले गुण होते. त्यामुळे सौरभ यांना सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात सहज प्रवेश मिळाला असता. परंतु ‘भूगर्भशास्त्र’ विषयातील करिअर खुणावत होते.

त्यामुळे वैद्यकीय शिक्षणाऐवजी भूगर्भशास्त्राची वाट निवडली. त्यासाठी त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयातून बी. एस्सी (जिओलॉजी) पदवी पूर्ण केली. पदव्युत्तर पदवी शिक्षणासाठी त्यांनी चेन्नईतील अण्णा विद्यापीठ गाठले.

तेथे सुवर्णपदकासह एम.एस्सी (जिओलॉजी) शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर फेलोशिपच्या सहाय्याने ‘पीएच.डी.’द्वारे संशोधनाचा मार्ग सौरभ यांच्यासाठी मोकळा होता. परंतु, त्यांनी यूपीएससी परीक्षा देण्याचे ठरविले. या परीक्षेत पहिल्या प्रयत्नात अपयश आले. पण, अधिक जोमाने दुसऱ्यांदा परीक्षा देत घवघवीत यश मिळविले.

दरवर्षी देशभरातील अंदाजे दहा ते पंधरा हजार विद्यार्थी ही परीक्षा देतात. यंदा देशभरातील २४ जागांसाठी ही परीक्षा घेण्यात आली. परीक्षेनंतर मुलाखतीच्या वेळी जवळपास १०९ उमेदवार होते. त्यातून सौरभ यांची तिसऱ्या क्रमांकाने निवड झाली आहे. आता ते लवकरच हैदराबादला प्रशिक्षणासाठी जाणार आहेत. त्यानंतर देशातील वेगवेगळ्या ठिकाणी ११ महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर ते भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया) मध्ये भूगर्भशास्त्रज्ञपदावर रुजू होतील.

असा केला अभ्यास
  परीक्षेपूर्वी एक वर्ष दररोज चार तास अभ्यास
  परीक्षा जवळ येताच अभ्यासाचे तास वाढविले.
  परीक्षेच्या आधी एक महिना दररोज आठ तास अभ्यास
  स्वत:चा स्वत: अभ्यास करण्यावर भर
  मित्रांनी वेगवेगळ्या विषयांचे नोट्‌स काढायचे ठरविले आणि ‘ग्रुप स्टडी’ केला
  आरशासमोर बसून केला मुलाखतीचा सराव

ध्रुवीय प्रदेशात संशोधन करण्याची इच्छा आहे. त्यामुळे संलग्न असणाऱ्या भूगर्भशास्त्र विषयात करिअर करायचे ठरविले. भूगर्भशास्त्रात पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर ‘पीएच.डी.’साठी फेलोशिपही मिळत होती. परंतु भूगर्भशास्त्रात काम करायचे होते, म्हणून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरू केली. पहिल्यांदा परीक्षा दिली, त्या वेळी ‘कट ऑफ’च्या दोन गुणांनी हुकला. मात्र दुसऱ्या वेळी आणखी जोरदार प्रयत्न केले आणि चांगल्या क्रमांकाने उत्तीर्ण झालो.
- सौरभ पवार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com