झाडांच्या मुळांवर काँक्रिटीकरणाचा घाव 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 जून 2019

सिमेंट काँक्रीटमध्ये फसलेल्या झाडांची स्थिती उघड करीत, ‘सकाळ’च्या शेकडो वाचकांनी आपापल्या भागातील झाडांची छायाचित्रे पाठविली आहेत. ही झाडे टिकण्यासाठी त्यांना मोकळीक द्या, अशी अपेक्षाही पुणेकरांनी व्यक्त केली आहे.

पुणे - सिमेंटचे रस्ते आणि सिमेंटच्या पदपथांनी घेरल्याने शहरातील सव्वालाख झाडांच्या मुळावर घाव घातला जात आहे. ही झाडे कशी-बशी तग धरून आहेत. पण, कोणत्याही क्षणी ही उन्मळून पडण्याची भीती निर्माण झाली आहे. पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी सर्वांचीच असल्याची जाणीव करून देणाऱ्या पुणे महापालिकेच्या बेजबाबदारपणा हेच त्याच्या ‘मुळाशी’ आहे.

हे धक्कादायक वास्तव  पुढे आले आहे. वर्दळीच्या आणि प्रमुख रस्त्यावरील झाडांची स्थिती बिकट आहे. हे रस्ते आणि पदपथ झाडांच्या जिवावर उठले असूनही महापालिकेच्या पर्यावरण अहवालात अशा झाडांच्या संवर्धनाचा साधा उल्लेखही सापडत नाही. 

डांबरी रस्त्यांच्या तुलनेत सिमेंटचे रस्ते खर्चिक असले, तरी त्यांचा दर्जा चांगला असल्याचा दावा करत सध्या सिमेंट रस्ते बांधणीला प्राधान्य दिले जात आहे. शहरातील एकूण रस्त्यांच्या तुलनेत २५ टक्के रस्ते हे सिमेंट काँक्रिटचे असून, बहुतांश भागातील  पदपथावर सिमेंटचे ब्लॉक बसविले आहेत. मात्र, तेथील झाडे जगविण्यासाठीचे उपाय करताना महापालिकेने आखडता हात घेतला आहे. त्यामुळे सुमारे पाचशे किलोमीटर लांबीच्या सिमेंटच्या रस्त्यांच्या परिसरातील सव्वा लाख झाडे वाळू आणि सिमेंटच्या थरात उभे असल्याची वस्तुस्थिती पुढे आली आहे. अशी झाडे जागविण्याच्या उद्देशाने काही उपाययोजना आहेत का? याची पाहणी ‘सकाळ’ने विविध भागांत केली. त्यात जुन्या झाडांची अवस्था फारच  धोकादायक असल्याचे दिसून आले आहे. 

या भागातील झाडांनी धरलीय तग 
फर्ग्युसन रस्ता, जंगली महराज रस्ता, लष्कर परिसर (कॅम्प), कर्वे रस्त्याचा काही भाग, टिळक रस्ता, नाना पेठ, केशवनगर

झाडांना मोकळीक द्या!
सिमेंट काँक्रीटमध्ये फसलेल्या झाडांची स्थिती उघड करीत, ‘सकाळ’च्या शेकडो वाचकांनी आपापल्या भागातील झाडांची छायाचित्रे पाठविली आहेत. ही झाडे टिकण्यासाठी त्यांना मोकळीक द्या, अशी अपेक्षाही पुणेकरांनी व्यक्त केली आहे. शहरातील वृक्षसंपदा वाचविण्याच्या या मोहिमेत सहभागी होण्याचा त्यांचाही निश्‍चय आहे.    


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: save tree in pune from cement road