आळंदीत वारकऱ्याला बुडण्यास वाचविले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जुलै 2018

आज दुपारी दोनच्या सुमारास आळंदीतील इंद्रायणी नदीमधे औरंगाबादचा चाळीसीतील वारकरी विजय नवघरे हा आंघोळीसाठी पाण्यात उतरला. नाक दाबून पाण्यात बुडी मारण्याचा प्रयत्नात असताना पाण्याचा अंदाज आला नाही आणि तो चक्क वाहत पुढे चालला होता

आळंदी - आळंदी पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्याने स्वतः नदीत उडी मारून इंद्रायणीत बुडणाऱ्या दोघा वारकऱ्याचे प्राण वाचविले. दरम्यान मावळ भागातील पावसामुळे आळंदीत इंद्रायणीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने एनडीआरएफचे तेरा जवान वारीत वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी इंद्रायणीकाठी ठेवले असल्याची माहिती मुख्याधिकारी समिर भूमकर यांनी दिली.

आज दुपारी दोनच्या सुमारास आळंदीतील इंद्रायणी नदीमधे औरंगाबादचा चाळीसीतील वारकरी विजय नवघरे हा आंघोळीसाठी पाण्यात उतरला. नाक दाबून पाण्यात बुडी मारण्याचा प्रयत्नात असताना पाण्याचा अंदाज आला नाही आणि तो चक्क वाहत पुढे चालला होता. यावेळी पालिकेच्या सफाई कर्मचारी विलास पवार यांनी त्याला वाहून जाताना पाहिले आणि पवार यांनी तत्काळ पाण्यात उडी मारून प्राण वाचविण्याचा प्रयत्न केला. यावेळी नवघरे यांना भक्त पुंडलिक मंदिराच्या पुढे वाहून जात असताना पवार यांनी त्याला पाण्याच्या प्रवाहाच्या कडेला आणून बसविले. त्यानंतर नवघरे याच्या पोटात गेलेले पाणी काढण्यात आले. दरम्यान आणखी एक बारा-तेरा वर्षाचा मुलगा पाण्यात पोहण्यासाठी उडी मारताना वाहत चालला असताना त्यालाही वाचविले. मात्र पाण्याबाहेर काढल्यावर तो पळून गेला.

दरम्यान आषाढी वारीत यंदाच्या वर्षी इंद्रायणीला पाणी वाहत असून मावळ भागात पावसामुळे आणखी पाण्याच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे आळंदी पालिकेने जिवरक्षक आणि रबर बोट इंद्रायणीच्या पात्रात उभी केली आहे. याचबरोबर वाहून जाणाऱ्या लोकांना वाचविता यावे यासाठी पाण्यामधे मोठा दोरखंडही सोडण्यात आला आहे. तर बुडून अथवा वाहून जाणाऱ्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफचे जवानही मागविण्यात आले आहेत.

मात्र वारकरी नदीत पोहण्यासाठी अथवा पात्रात बुडी मारण्याचा प्रकार करत असल्याने वाहन जाण्याचा प्रकार होत आहे. यामुळे वारकऱ्यांनी दगडी घाटावरूनच आंघोळ करावी. तसेच महिला वारकऱ्यांनी कपडे बदलण्यासाठी घाटावर उभे करण्यात आलेले चेंजिग रूमचा वापर करावा, असे आवाहन मुख्याधिकारी समिर भूमकर यांनी केले.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: saved a life of man at aalandi