आधी ठरली परीक्षा, मग चर्चा निविदेची;सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षेचा घोळ 

आधी ठरली परीक्षा, मग चर्चा निविदेची;सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षेचा घोळ 

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने प्रथम सत्राची परीक्षा १५ मार्चपासून घेण्याचा निर्णय घेतला. पण, ज्या एजन्सीकडून आॅनलाइन परीक्षा घेतली जाणार आहे, त्या एजन्सीला परीक्षा घेण्याचा अधिकारच नाही असा मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्यामुळे आता पुन्हा एकदा नव्याने निविदा काढण्यासाठी प्रक्रिया सुरू होणार असल्याचे सांगितले जात आहे. विद्यापीठात समन्वय नसल्याने यात विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. 

पुणे विद्यापीठाने पुणे, नाशिक, नगर जिल्ह्यातील सुमारे साडेसहा लाख विद्यार्थ्यांची प्रथम सत्राची परीक्षा १५ मार्चपासून घेण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांकडून परीक्षा अर्ज भरून घेणे, प्रश्‍नसंच तयार करणे यांसह इतर कामे सुरू झाली आहेत. परीक्षा विभागाने अंतिम वर्षाची व बॅकलॉगची परीक्षा घेतलेल्या नोईडास्थित कंपनीकडूनच प्रथम सत्राची परीक्षा घेण्याची तयारी सुरू केली. त्यासाठी कंपनीच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठका झाल्या आहेत. त्यामुळे परीक्षा ठरलेल्या वेळेतच होतील, असे परीक्षा विभागाकडून सांगितले जात होते. मात्र, नुकत्याच झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत अंतिम वर्षाची परीक्षा घेतलेल्या एजन्सीला केवळ त्याच परीक्षेचे काम दिले होते. प्रथम सत्राची परीक्षा घेता येणार नाही. त्यामुळे नव्याने कंपनी निवड झाली पाहिजे, असा मुद्दा उपस्थित करण्यात आला. या बैठकीनंतर पर्चेस कमिटीची बैठक झाली आहे. विद्यापीठातील अधिकारी व सदस्य यांच्यातील अंतर्गत राजकारणात परीक्षेचे वेळापत्रक निघण्यास उशीर होत असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, परीक्षेची तारीख जाहीर झाली तरी त्याचे परिपत्रक, वेळापत्रक याबाबत काहीच माहिती मिळत नसल्याने विद्यार्थ्यांची अस्वस्थता वाढत चालली आहे. सोशल मिडीयावर विद्यार्थ्यांनी रोष व्यक्त करण्यास सुरवात केली आहे. 

जुन्या एजन्सी ॲक्टिव्ह 
प्रथम सत्राची आॅनलाइन परीक्षा घेण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्याबाबत हालचाली सुरू असल्‍या तरी त्याबाबत गोपनीयता बाळगली जात आहे. असे असताना विद्यापीठात यापूर्वी काम केलेल्या काही कंपन्या पुन्हा लाखो विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याचे काम मिळावे यासाठी ॲक्टिव्ह झाल्या आहेत. त्यामुळे येत्या काळात याबाबत महत्त्वाचे बदल होऊ शकतात, असे विश्‍वसनीय सूत्रांनी सांगितले. 

सध्या जी एजन्सी आहे, तिला नियमानुसार प्रथम सत्राची परीक्षा घेता येणार नाही. त्यामुळे याची प्रक्रिया परीक्षा विभागाने यापूर्वीच करायला पाहिजे होती. परीक्षेसाठी नवीन एजन्सी निवडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. लवकरच ती पूर्ण होईल. यामध्ये परीक्षेला काहीसा विलंब होऊ शकतो. 
- राजेश पांडे, सदस्य, व्यवस्थापन परिषद 

प्रथम सत्र परीक्षेची तयारी वेगात सुरू आहे. पण, एजन्सी निवड हा विषय गोपनीय आहे. त्याबाबत काही सांगता येणार नाही. 
- डॉ. एन. एस. उमराणी,  प्र-कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com