पुणे विद्यापीठाने शोधली 'ऑनलाइन' परीक्षेतील अडचणीची कारणे; वाचा सविस्तर बातमी

Students_Online_Exam
Students_Online_Exam

पुणे : विद्यार्थी, प्राध्यापकांमधील तंत्रज्ञान साक्षरतेचा अभाव आणि विद्यार्थ्यांची सराव चाचण्यांना (मॉक टेस्ट) गैरहजेरी या कारणांमुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेत अडचणी आल्या, असा खुलासा विद्यापीठाने सोमवार (ता.१९) केला. 'तांत्रिक कारणाने विद्यार्थ्याची परीक्षा होऊ शकली नाही, तर फेरनियोजन करून त्यांना परीक्षा देता येईल,' असे स्पष्टीकरणही विद्यापीठाने सुमारे हजार शब्दांच्या खुलाशात केले.

विद्यापीठाने परीक्षेसाठी केलेल्या तंत्रज्ञानाचा वापर 'इतर विद्यापीठांसाठी आदर्शवत,' असल्याचा दावा खुलाशात केला. "जगभरात परीक्षा पध्द्तीमध्ये झालेले बदल आणि नवीन शैक्षणिक धोरणातील उद्दिष्टे या दोन्हींच्या दृष्टीकोनातून विद्यापीठाने टाकलेले पाऊल महत्वपूर्ण आहे. येणाऱ्या काळात पुढील पिढ्या याची नक्की नोंद घेतील,' अशा आशावाद विद्यापीठाने निवेदनात व्यक्त केला. गेल्या सोमवारपासून (12 ऑक्टोबर) सुरू झालेल्या परीक्षांमध्ये तांत्रिक अडचणी असल्याच्या विद्यार्थ्यांच्या तक्रारी आहेत. त्यावर विद्यापीठाने सविस्तर भूमिका मांडली.

प्रश्नपत्रिकेत आल्या अडचणी
ऑनलाईन परीक्षेमधील अडचणींची कारणमीमांसा करताना विद्यापीठाने म्हटले आहे, की ऑनलाइन परीक्षेसाठी एक तास कालावधी, 60 बहुपर्यायी प्रश्न असे स्वरूप ठरले. चार ते वीस सप्टेंबरपर्यंत 18 हजार प्राध्यापकांना बहुपर्यायी प्रश्नपत्रिका तयार करण्याचे आवाहन केले. प्रश्नपत्रिका विद्यापीठाकडे विशिष्ट आराखड्यात (एक्सेल फॉरमॅट) देणे आवश्यक होते. प्राध्यापकांनी फॉरमॅटमध्ये फेरफार न करता इंग्रजी आणि मराठी युनिकोड फॉन्टमध्ये माहिती भरणे आणि ज्या ठिकाणी गणितीय सूत्र/आकृती आहेत. तिथे जेपीजी स्वरूपात देणे अपेक्षित होते. हे सर्व शिक्षक, प्राध्यापक यांच्याकरिता आव्हानात्मक होते.

सहा ऑक्टोबरपर्यंत जवळपास 4000 विषयांच्या प्रश्नपत्रिका विद्यापीठाकडे सादर केल्या. काही विषयांचे इंग्रजी आणि मराठी अशा दोन्हीमध्ये प्रश्नपत्रिका तयार करण्यात आल्या. टेक्नोसॅव्ही नसलेल्या प्राध्यापकांना आराखड्यात माहिती भरताना काही अडचणी आल्या. त्यांनी मूळ आराखड्यात फेरफार करून माहिती भरली. परीक्षा विभागाने या सर्व गोष्टींची योग्य वेळी दखल घेत सर्व तांत्रिक अडचणी कशा पध्द्तीने दूर होतील याला प्राधान्य दिले.

महत्वाचे मुद्दे :
- पुणे, नाशिक आणि नगर जिल्ह्यांमधून ऑनलाईन आणि ऑफलाईन मिळून 2 लाख 50 विद्यार्थी परीक्षा देत आहेत.
- एकूण 3300 विषयांच्या परीक्षेचे नियोजन; अनेक विषयांच्या प्रश्नपत्रिका या मराठी आणि इंग्रजीतही.
- कुलगुरू प्रा. डॉ. नितीन करमळकर परीक्षा सुरू झाल्यापासून परीक्षा भवनमधील वॉर रूममध्ये नियोजनावर लक्ष ठेवून आहेत.
- प्रश्नपत्रिकांची गोपनीयता महत्वाची; त्यानुसार सर्व नियोजन. प्रश्नपत्रिकांची गुणवत्ता तपासणी विषयतज्ज्ञांमार्फत.

चॅटिंगसाठीच नव्हे; शिक्षणासाठी मोबाईल वापरा!
"मानव्यशास्त्र, सामाजिक शास्त्र विषयाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पध्द्तीने परीक्षा देताना जास्त अडचणींना सामोरे जावे लागले. विद्यापीठामार्फत पहिल्यांदाच ऑनलाईन पध्द्तीने परीक्षांचे नियोजन होत असल्याने परीक्षा सॉफ्टवेअर प्रणालीबाबत जे शिक्षक, प्राध्यापक टेक्नोसॅव्ही नाहीयेत अशांना तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागले. भविष्यातील शिक्षण पध्द्तीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर जास्त होणार असल्याने विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञान साक्षरतेबाबत जागरूक राहायला हवे. मोबाईलचा वापर केवळ चॅटिंगसाठी न करता शिक्षणासाठीसुद्धा करता येऊ शकतो,' असा सल्ला विद्यापीठाने दिला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com