ऑफलाइन, ऑनलाइन परीक्षेत चौथ्या दिवशीही अडथळे 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 17 October 2020

पहिल्या सत्रातील पेपर सुरळीत पार पडले. मात्र, दुपारच्या दोन्ही सत्रातील पेपर देताना विद्यार्थ्यांना अडचणी आल्या. वेळापत्रकानुसार संबंधित विषयाचा पेपर दुसराच आला.

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ऑनलाइन व ऑफलाइन परीक्षेतील तांत्रिक अडचणींची मालिका चौथ्या दिवशीही सुरूच राहिला. पहिल्या सत्रातील पेपर सुरळीत पार पडले. मात्र, दुपारच्या दोन्ही सत्रातील पेपर देताना विद्यार्थ्यांना अडचणी आल्या. वेळापत्रकानुसार संबंधित विषयाचा पेपर दुसराच आला. तसेच मराठी माध्यमांच्या विद्यार्थ्यांना इंग्रजीतून पेपर गेला. यामुळे ऑफलाइन परीक्षेचे वेळापत्रक जवळपास एक ते दीड तास बिघडले होते. 

पुणे विद्यापीठातर्फे अंतिम वर्षाची परीक्षा बहुपर्यायी प्रश्‍न (मल्टिपल चॉइस क्वेश्‍चन-एमसीक्‍यू) पद्धतीने ऑनलाइन व ऑफलाइन माध्यमातून परीक्षा घेतली जात आहे. बुधवारी रात्री मुसळधार पाऊस झाल्याने अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली. वीज पुरवठा खंडित झाला. मोबाईलचे नेटवर्क गायब होते, त्यामुळे गुरुवारी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडून गुरुवारीही परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. परंतु, विद्यापीठाने नियोजित वेळापत्रकानुसार गुरुवारी परीक्षा घेतली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सकाळच्या सत्रात बॅकलॉगच्या एकूण 10 हजार 799 विद्यार्थ्यांनी ऑनलाइन लॉगइन केले. तर, दुपारच्या दोन सत्रात नियमित अभ्यासक्रमांच्या 43 हजार 648 विद्यार्थ्यांनी लॉगइन केले, असे महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी बोलताना सांगितले. 

दरम्यान पुणे विद्यापीठाने परीक्षा विनाअडथळा पार पडल्याचे सांगितले. 60 हजार 822 विद्यार्थी ऑनलाइन परीक्षा देणार होते, त्यापैकी 54 हजार 384 जणांनी परीक्षा दिली. तर ऑफलाइनच्या 15 हजार 196 पैकी 13 हजार 501 जणांनी केंद्रावर जाऊन परीक्षा दिली. 

नेमक्‍या कोणत्या अडचणी आल्या 
- ऑनलाइन परीक्षा देणाऱ्या बीएच्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्याला अर्थशास्त्राऐवजी सांख्यिकीचा पेपर आला. 
- एमएससी बॉटनीच्या पेपरला तांत्रिक प्रॉब्लेम आले. 
- इंग्रजी स्पेशलच्या पेपरला परीक्षा देण्यापूर्वीच परीक्षा दिल्याचे विद्यार्थ्यांना लॉगइन केल्यानंतर दिसत होते. 
- एमसीक्‍यूचे प्रश्‍न न दिसणे किंवा पर्याय न दिसणे असेही काहीठिकाणी प्रकार. 
- ऑफलाइन परीक्षा देणाऱ्या राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांना मराठी ऐवजी इंग्रजीतून पेपर आला. 
- सायंकाळच्या चारच्या अर्थशास्त्राच्या पेपरला दुसराच पेपर आला. 
- विद्यार्थ्यांना पेपर बदलून घेण्यासाठी वाट पहावी लागली 

पहिलीच ऑनलाइन परीक्षा असल्याने अडचणी येणे शक्‍य आहे. पण सलग चार दिवस त्याच त्या अडचणी येत असतील, तर संबंधित एजन्सीच्या कामाची चौकशी झाली पाहिजे. 
- कुलदीप आंबेकर, अध्यक्ष, स्टुडंट हेल्पिंग हॅंड 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Savitribai phule pune university offline and online issue