विद्यार्थ्यांना विद्यावेतन न दिल्यास उपोषण 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 जून 2018

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून एम.फिल. आणि पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना यापूर्वी देण्यात येणारे विद्यावेतन पुन्हा सुरू करण्यात यावे, अशी मागणी विद्यापीठातील अधिसभा सदस्यांनी केली आहे. ही मागणी पंधरा दिवसांत मान्य न झाल्यास उपोषण करण्याचा इशारा सदस्यांनी दिला आहे. 

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून एम.फिल. आणि पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना यापूर्वी देण्यात येणारे विद्यावेतन पुन्हा सुरू करण्यात यावे, अशी मागणी विद्यापीठातील अधिसभा सदस्यांनी केली आहे. ही मागणी पंधरा दिवसांत मान्य न झाल्यास उपोषण करण्याचा इशारा सदस्यांनी दिला आहे. 

मागील काही महिन्यांपासून एम.फिल आणि पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा विद्यावेतन दिले जात नाही. त्या पार्श्‍वभूमीवर अधिसभा सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. एम.फिल. आणि पीएच.डी. करणारे विद्यार्थी हे ग्रामीण भागातून तसेच, देशाच्या कानाकोपऱ्यातून विद्यापीठात संशोधन करण्यासाठी येत असतात. याची दखल घेऊन विद्यापीठ प्रशासनाने संबंधित विद्यार्थ्यांना विद्यावेतनाच्या माध्यमातून आर्थिक मदत करून त्यांची शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी प्रयत्न करावा. या योजनेमुळे मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना आर्थिक मदत होते, असे मत सदस्य व्यक्त करत आहेत. 

विद्यावेतन मिळत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे आर्थिक तसेच, शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी विद्यावेतन योजना पुन्हा पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी विद्यापीठातील अधिसभेचे सदस्य दादाभाऊ शिनलकर यांच्यासह शामकांत देशमुख, डॉ. संजय खरात, संतोष ढोरे, शशिकांत तिकोटे, डॉ. तानाजी वाघ, अभिषेक बोके, विश्‍वनाथ पडवी, अनिल विखे या सदस्यांनी केली आहे. या मागणीचे पत्र विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर यांना देण्यात आले आहे. 

विद्यापीठातर्फे यापूर्वी विद्यार्थ्यांना दरमहा विद्यावेतन दिले जायचे. एम.फिल. करणाऱ्या विद्यार्थ्यांना साधारणत: दरमहा पाच हजार रुपये, तर पीएच.डी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा आठ हजार रुपये दिले जात होते. आता विद्यापीठ अनुदान आयोगाने विद्यावेतन देणे बंद केले असले, तरीही विद्यापीठाच्या निधीतून हे विद्यावेतन देणे सहज शक्‍य आहे. 
- दादाभाऊ शिनलकर, सदस्य, अधिसभा 

Web Title: Savitribai Phule Pune University pune news