भोजनालयाच्या नव्या निर्णयाला विरोध (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 एप्रिल 2019

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ‘रिफेक्‍टरी’मध्ये (भोजनालय) सभासद नसलेल्या विद्यार्थ्यांना जेवणाची सुविधा बंद करण्याचा नवीन निर्णय विद्यापीठाने जाहीर केला आहे. या निर्णयाविरोधात विद्यार्थ्यांनी रिफेक्‍टरीसमोर जोरदार घोषणाबाजी करीत सोमवारी आंदोलन केले.

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ‘रिफेक्‍टरी’मध्ये (भोजनालय) सभासद नसलेल्या विद्यार्थ्यांना जेवणाची सुविधा बंद करण्याचा नवीन निर्णय विद्यापीठाने जाहीर केला आहे. या निर्णयाविरोधात विद्यार्थ्यांनी रिफेक्‍टरीसमोर जोरदार घोषणाबाजी करीत सोमवारी आंदोलन केले.

गेल्या काही दिवसांपासून रिफेक्‍टरीमध्ये जेवणाचा दर्जा खालावल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. मागील आठवड्यात जेवणामध्ये सलग दोन-तीन दिवस अळ्या सापडत होत्या. याबाबत विद्यार्थ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यानंतर विद्यापीठाने कॅन्टीनबाबत बैठक बोलावली. रिफेक्‍टरीच्या सल्लागार समितीच्या या बैठकीत नव्याने काही निर्णय जाहीर करण्यात आले. विद्यापीठाच्या रिफेक्‍टरीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी भोजन करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. यामध्ये दररोज सुमारे तीनशे विद्यार्थी जेवतात. अनपेक्षितपणे येणाऱ्या विद्यार्थ्यांमुळे नियोजन करणे शक्‍य होत नाही. त्यामुळे भोजन व्यवस्थेवर परिणाम होतो. यामुळे वाद निर्माण होत आहेत. भोजनाचा दर्जा टिकविण्याच्या दृष्टीने नियोजनबद्ध व्यवस्थापन व्हावे, या उद्देशाने रिफेक्‍टरी सल्लागार समितीने काही नवीन निर्णय घेतले आहेत. या निर्णयाला विद्यार्थ्यांनी विरोध केला.

रिफेक्‍टरीबाहेर विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत नव्या निर्णयाला विरोध दर्शविला. विद्यापीठातील वातावरण तापल्यामुळे पोलिसांना बोलाविण्यात आले. या आंदोलनात विद्यार्थ्यांसमेवत काही विद्यार्थी संघटनादेखील सहभागी झाल्या होत्या.

या आंदोलना वेळी विद्यार्थ्यांनी टेबल उचलून फेकला आणि काचाही फोडल्या. काही विद्यार्थ्यांनी बंदोबस्तावर असणाऱ्या महिला सुरक्षारक्षकांना धक्काबुक्कीही केली. या प्रकारात एक सुरक्षा अधिकाऱ्याला इजा झाली आहे. याबाबत पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली.

असे आहेत नवे निर्णय  
कच्चा मालाची गृहव्यवस्थापन विभाग आणि सल्लागार समितीमार्फत नियमित तपासणी करावी
सभासद नसणाऱ्यांना रिफेक्‍टरीमध्ये देण्यात येणारी भोजन व्यवस्था बंद करावी
एका थाळीमध्ये एकापेक्षा जास्त व्यक्तींना जेवता येणार नाही.
रिफेक्‍टरीचे ताट भोजनगृहाबाहेर नेऊ नये
नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर प्रतिबंध करण्याची कार्यवाही करावी

विद्यार्थ्यांना भोजनाची चांगली सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी मध्यवर्ती भोजनालयात नियमित मासिक सदस्यांनाच भोजन उपलब्ध करून दिले जाईल. इतर विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह क्रमांक आठ आणि नऊ, यांसह मुलींसाठी असलेल्या वसतिगृहातील भोजनालय आणि विद्यापीठाच्या आवारात असणाऱ्या अन्य तीन कॅंटीनमध्ये व्यवस्था आहे. याबाबत काही आक्षेप असल्यास विद्यार्थ्यांनी भोजनालय समितीकडे ते सनदशीर पद्धतीने नोंदवावेत.
- राजेश राहेरकर, सहायक कुलसचिव,  विद्यापीठ गृहव्यवस्थापन विभाग

Web Title: Savitribai Phule Pune University Student Agitation Refectory